बिहारमध्ये माओवाद्यांचा धुडगूस

पीटीआय, गया
येथील सुरक्षा दलाच्या कारवाईत गेल्या आठवडय़ात माओवाद्यांची महिला कमांडर ठार झाल्याच्या रागातून माओवाद्यांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. दोन दिवसांचा बिहार, झारखंड बंद पुकारण्यात आला असून पहिल्याच दिवशी गया येथील जी टी रस्त्यावर ३२ वाहने सशस्त्र माओवाद्यांनी पेटविली.
दरम्यान पोलिसांनी या मार्गाचा ताबा घेतला असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. जी टी रस्ता कोलकाता- दिल्ली महामार्गाला मिळतो. यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. जवळपास ५० सशस्त्र माओवाद्यांच्या गटाने या मार्गावरील वाहतूक थांबविली व प्रवाशांना खाली उतरवत वाहने पेटवून दिली. ही घटना गया जिल्ह्य़ातील बिशुनपूर आणि तरादिह गावांदरम्यान घडल्याचे पटना विभागाचे पोलीस महानिरीक्षक कुंंदन कृष्णन यांनी सांगितले.
या वाहनांमध्ये एलपीजी गॅस व डिझेल टँकरचा समावेश होता. माओवाद्यांनी टँकरच्या केबीनला आग लावली मात्र ही आग टाकीपर्यंत पोहोचू न शकल्याने मोठी दुर्घटना टळली.

नारायण साईला हंगामी जामीन
अहमदाबाद : आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याला गुजरात उच्च न्यायालयाने सोमवारी तीन आठवडय़ांसाठी हंगामी जामीन मंजूर केला.
नारायण साई याच्या आईवर शस्त्रक्रिया होणार असल्याने त्याला हंगामी जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण साई जामिनाच्या काळात पोलिसांच्या देखरेखीखाली राहील, असे न्या. व्ही. एम. पांचोली यांनी त्याला सशर्त हंगामी जामीन मंजूर करताना स्पष्ट केले.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान हुतात्मा
श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी लष्कराची छावणी आणि बीएसएनएलच्या फ्रॅन्चायझीवर हल्ला करण्याची आगळीक केली. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर एका दहशतवाद्यासह आणखी एक जण ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले.
काश्मीरच्या दक्षिणेकडील कुलगाम जिल्ह्यातील यारिपोरा परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर गोळीबार केला त्यामध्ये धरम राम यांना वीरमरण आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

केनियन तरुणांची पोलिसाला मारहाण
मुंबई : दोन केनियन तरुणांनी रविवारी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत भायखळा रेल्वे स्थानकात गोंधळ घालून बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे पोलिसाला मारहाण केली.
या दोघांपैकी एकाचा मोबाईल हरविल्याने त्याची फलाटवरील रेल्वे कॅटीन कर्मचाऱ्याशी वादावादी झाली. त्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. . तो प्रकार पाहून छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाचे पोलीस हवालदार कुंभार मदतीला धावले. तेव्हा या तरुणांनी हवालदाराला त्यांच्याच दांडुक्याने मारहाण केली. नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कुमक पाठवून या पोलिसाची सुटका केली. मारहाणीत जखमी झालेले पोलीस हवालदार आणि या दोन्ही तरुणांवर रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. पोलिसांनी त्यांच्यासह रेल्वे कॅंटीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे तरुण ‘स्टुडंट व्हिसा’वर मुंबईत आले आहेत.

मूरी एक्स्प्रेस घसरून ३ ठार
कौशंबी : झारखंडहून जम्मूतावीला जाणारी मूरी एक्स्प्रेस उत्तर प्रदेशमध्ये घसरून झालेल्या अपघातात महिलेसह तीन ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत.
मूरी एक्स्प्रेसचे १० डबे सोमवारी घसरले. यामध्ये दोन सामान्य व चार स्लिपर डब्यांचा समावेश आहे. हा अपघात सिरूथी व अत्सारी रेल्वे स्थानकांदरम्यान घडल्याचे उत्तर-मध्य रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी विजस कुमार यांनी सांगितले. यात तीन ठार तर नऊ जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बचाव पथक व रेल्वे घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमी व मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.