नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झालेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेला आणखी एका वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरू आहेत. या चळवळीला पायबंद घालण्यासाठी व नक्षलवाद्यांचे खच्चीकरण करण्यासाठी राज्य सरकारने २००५ पासून आत्मसमर्पण योजना सुरू केली. फसवणूक होऊन किंवा भितीपोटी नक्षलवादी चळवळीत गेलेल्या अथवा त्याकडे आकर्षित झालेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या चळवळीतून बाहेर पडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या तरुणांना चार हजारापासून ते दहा लाख रुपयापर्यंत बक्षीसे दिली जातात. तसेच त्यांच्या घराकरिता जागा, अनुदान शिक्षण, स्वयंरोजगार अशा अनेक सवलती देण्यात येतात.
गेल्या आठ-नऊ वर्षांत मोठय़ा प्रमाणावर नक्षलवादी तरुणांनी आत्मसमर्पण करुन सामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही योजना आणखी एक वर्ष पुढे चालू ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.  या योजनेला २८ ऑगस्ट २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून गृह विभागाने तसा आदेश काढला आहे.