पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले असा नामविस्तार झाल्यानंतर जळगाव विद्यापीठाचा बहिणाबाई चौधरी तर सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असा नामविस्तार करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली असता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्याला शनिवारी अनुकुलता दर्शविली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुण्यापाठोपाठ जळगाव आणि सोलापूर विद्यापीठांचा नामविस्तार करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या मागणीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शविला आणि त्यासाठी पक्ष सरकारमध्ये प्रयत्न करील, असे जाहीर केले.
विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निलेश राऊत यांनी पक्षात विद्यार्थी कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्याची मागणी केली असता पवार यांनी, आगामी निवडणुकीत युवक कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पुढील पाच वर्षांने होणाऱ्या निवडणुकीच्या वेळी युवकांची फळी पक्षकडे तयार असेल. तसेच राजकीय पाया पक्का करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी कार्यकर्त्यांनी त्याकडे बघावे, असा सल्लाही पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ४ ते २४ ऑगस्ट दरम्यान कॅम्पस् कॉर्नर हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नामांतराचा वाद उद्भवणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविद्यालयीन निवडणुकांचा मुद्दा आता बासनात 
महाविद्यालयातील बंद पडलेल्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी जितेंद्र आव्हाड व अन्य काही नेते आग्रही होती. पण पक्षातूनच या निवडणुकांना विरोध झाला. यामुळे विद्यार्थी काँग्रेसने हा विषय सोडून दिला आहे.