नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अन्य पक्षांच्या पर्यायांचा शोध घेणारे माजी मंत्री गणेश नाईक यांना राष्ट्रवादीने चार हात दूरच ठेवले आहे. राज्य पातळीवरील नेत्यांकडे जिल्ह्यांची जबाबदारी सोपविताना ठाण्याची ‘सुभेदारी’ जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षसंघटना वाढविण्यासाठी राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून माजी मंत्र्यांकडे जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यांची काळजी घ्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. पक्ष संघटना वाढविण्यासाठी आक्रमक होण्याचा आदेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आला. पालकमंत्री किंवा संपर्कमंत्रीपद भूषविलेले जिल्हे नेत्यांना वाटून देण्यात आले आहेत. २४ आमदारांचे संख्याबळ असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना दूर ठेवण्यात आले. नाईक राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्यानेच पक्षाने त्यांच्या नावाचा विचारच केलेला नाही. ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपासूनही नाईक यांना दूर ठेवण्यात आले होते.
सुप्रियाताई आक्रमक
पराभवामुळे नेते आणि कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, पण ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल बाहेर पडावे, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. गणेश नाईक यांच्यासह पक्षाचे काही नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. मोठय़ा संख्येने कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. या पाश्र्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा मानला जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या राजकारणापासून पद्धतशीरपणे लांब ठेवण्यात आलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा कोकणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नेते आणि जबाबदारी सोपविण्यात आलेले जिल्हे पुढीलप्रमाणे-
अजित पवार (पुणे), छगन भुजबळ (नाशिक), मधुकरराव पिचड (नगर), दिलीप वळसे-पाटील (अमरावती, जळगाव), जयदत्त क्षीरसागर (बीड, लातूर), धनंजय मुंडे (नागपूर, वर्धा), सचिन अहिर (रायगड), हसन मुश्रीफ (कोल्हापूर, बुलढाणा), मनोहर नाईक (यवतमाळ, वाशिम), दिलीप सोपल (सोलापूर, उस्मानाबाद)
गणेश नाईक शिवसेनेच्या वाटेवर?
ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे प्रबळ नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाला पक्षातून तीव्र विरोध झाल्याने त्यांनी स्वगृही अर्थात शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी चर्चा केल्याचे समजते. ठाणे जिल्ह्य़ातील विविध निवडणुकांपासून नाईक यांना राष्ट्रवादीने दूर ठेवल्याने या चर्चेला अधिक जोर आला आहे. मात्र नाईक यांच्या शिवसेना-प्रवेशाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे.  नवी मुंबई पालिकेची एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक आहे. पालिकेत सध्या राष्ट्रवादीची नावाला सत्ता असली तरी ती नाईक यांची सत्ता मानली जाते. त्यामुळे ती टिकवण्यासाठी नाईक राष्ट्रवादी सोडण्याचा गेला महिनाभर विचार करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी प्रथम भाजपमध्ये चाचपणी केली, पण भाजपच्या बेलापूर आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांना जाहीर विरोध केला आहे. त्याचबरोबर भाजप नवी मुंबईत नाईकांना पूर्ण स्वतंत्र देणार नसल्याने नाईकांनी हा विचार सोडून दिला आहे. नाईक हे मूळचे शिवसैनिक असल्याने त्यांनी शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याचे निकटवर्तीयाकडून सांगितले जात आहे. या संदर्भात नाईक यांच्याशी संपर्क साध
ण्याचा प्रयत्न केला असता ते कल्याणला असल्याचे सांगण्यात आले.