मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं. उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. विधानसभेत हा मुद्दा मांडणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

राज्यपालांनी वाढवून दिलेली ५ ऑगस्टची मुदत उलटून गेली तरी मुंबई विद्यापीठाला अद्याप ४७७ पैकी फक्त २६५ परीक्षांचे निकाल जाहीर करता आले आहेत. दुसरी डेडलाईनही उलटून गेली तरी निकाल लावण्यात अपयश आल्याने सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे पोहोचले. आव्हाड यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकून निषेध दर्शवला.

‘मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. मुंबई विद्यापीठाची देशभरात नाचक्की झाली असून आम्ही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत हे सांगताना लाज वाटते’ अशा शब्दात आव्हाड यांनी विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली. दुसऱ्यांदा डेडलाईन उलटल्याने आम्ही प्रतिकात्मक निषेध म्हणून टाळं ठोकलं. विद्यार्थी आणि पालक किती चिडलेत हे विद्यापीठाला दिसणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरुंचा राजीनामा मागणाऱ्या शिवसेनेची नौटंकी सुरु आहे. त्यांनी आधी उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना मातोश्रीवर बोलावून राजीनामा द्यायला सांगितले पाहिजे असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

विद्यापीठाचे रखडलेले निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना ४ जुलै रोजी दिले होते. जवळपास महिनाभराचा अवधी देऊनही ३१ जुलैपर्यंत विद्यापीठाने केवळ १७३ परीक्षांचेच निकाल जाहीर केले. यानंतर विद्यापीठाला पाच ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली. आता विद्यापीठाने १५ ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करु असे आश्वासन दिले आहे.