काळ्या पैशांनंतर केंद्र सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक केला असून, सोने बाळगण्यावर निर्बंध येणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. सोने जास्त बाळगले तर तुम्ही देशद्रोही. मोजायला लागा, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/804319344180297728

सोने बाळगण्यावरील निर्बंधाबाबत आज अर्थमंत्रालयाने नवीन घोषणा केली आहे. त्यानुसार, विवाहित महिलांना ५० तोळे सोने बाळगता येणार आहे. तर अविवाहित महिलांना २५ तोळे, तर पुरुषांना केवळ १० तोळे सोने बाळगता येणार आहे. त्यापेक्षा जास्त सोने आढळल्यास आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अर्थमंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार, विवाहित महिलांनी ५० तोळे सोने जवळ बाळगल्यास आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकणार नाहीत. तर अविवाहित महिलांना २५ तोळे सोने बाळगण्याची
मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच पुरुषांसाठी १० तोळे सोने बाळगण्याची मर्यादा आहे. सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला चढवला आहे. विवाहित स्त्री ५० तोळे, अविवाहित स्त्री २५ तोळे आणि पुरुष फक्त १० तोळे सोने बाळगू शकतात. त्यापेक्षा जास्त सोने बाळगले तर तुम्ही देशद्रोही, चला मोजायला लागा, अशी खोचक टीका आव्हाड यांनी ट्विटद्वारे केली आहे. पैशांनंतर आता सरकारचा डोळा जनतेच्या सोन्यावर आहे, असेही ट्विट त्यांनी केले आहे. आता किती सोने घालायचे ते सरकार ठरवणार, तुघलकालाही मागे टाकणार, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

भारतीय नागरीक सोने आशिर्वाद म्हणून बनवतात. त्यांच्या सौंदर्याचा तो अविभाज्य भाग आहे. महिन्याकाठी शिलकीतून बनवलेले सोने एकाएकी सरकारच्या रडारवर आले आहे, असेही ते म्हणाले. यापूर्वी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली होती.