सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेल्याने पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली असली तरी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक बडय़ा नेत्यांवर आरोप झाले आहेत वा चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर तर नेहमीच आरोप होतात. गुन्हेगारांना मदत केल्यापासून ते भूखंडाचे श्रीखंड यासह विविध आरोप पवारांवर झाले. यूपीए सरकारमध्ये कृषी, अन्न व नागरीपुरवठामंत्री असताना महागाई वरून पवार नेहमीच लक्ष्य होत असत. पवारांच्या धोरणांमुळे महागाई झाली, असा त्यांच्यावर आरोप केला जात होता. वर्षांनुवर्षे पवारांवर अनेक आरोप झाले, पण कोठेही पवार सापडले नाहीत हे त्यांचे विशेष आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर विमानतळ आधुनिकीकरणावरून बरेच आरोप झाले. ‘आयपीएल’मध्ये त्यांच्या मुलीच्या सहभागावरून वादळ उठले होते.
छगन भुजबळ तेलगी घोटाळ्यातून सहीसलामत बाहेर पडले, पण बांधकाम घोटाळ्यात मात्र अडकले. ठाण्यातील बिल्डरच्या आत्महत्येप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव आले होते. या प्रकरणात ठाण्याच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

विविध नेत्यांवर आरोप
जलसंपदा खात्यातील घोटाळाप्रकरणी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची सध्या चौकशी सुरू आहे. पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर पुण्यातील जमिनीवरून आरोप झाले होते. महसूलमंत्री व तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सुप्रिया सुळे यांच्यावर जमिनीच्या प्रकरणावरून आरोप केले होते.