भाजपचा मालेगाव पॅटर्नअयशस्वी

मालेगाव महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही याची चिन्हे होतीच, पण सत्तेचा दावेदार काँग्रेस व विरोधी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युतीला मिळालेल्या जवळपास समसमान जागा आणि सेना, भाजप व एमआयएम या पक्षांना आलेले विशेष महत्व यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी सत्ता स्थापण्याचे गणित अवघड झाले आहे. त्रिशंकू कौलामुळे निर्माण झालेल्या अनिश्चितेच्या राजकीय स्थितीमुळे नेमके कोण सत्ता स्थापन करणार व कशाप्रकारे युती-आघाडी होईल, हे सांगणे आजच्या घडीला अत्यंत अवघड झाले आहे.

एकूण ८४ जागांच्या सभागृहात बहुमतासाठी ४३ जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युतीला २६ जागा मिळाल्या आहेत. या युतीत जनता दलाच्या सहा जागांचा समावेश असून निवडणुकीत एकमेव विजयी झालेला अपक्षही जनता दल पुरस्कृत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युतीचे संख्याबळ हे त्या अर्थाने २७ पर्यंत जाते. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी जवळपास या दोन्ही पक्षांना समान संधी असल्याचे स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक २५ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला १९ जागा जिंकणाऱ्या ‘तिसरा महाज’ने पाठिंबा दिल्यानंतर सत्ता स्थापन झाली होती. दरम्यानच्या काळात ‘तिसरा महाज’चे तत्कालिन आमदार मौलाना मुफ्ती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीने शहर विकास आघाडी व शिवसेनेच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याची यशस्वी खेळी केली होती. गेल्या काही दिवसात एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत परस्परांचे प्रमुख विरोधक असलेली काँग्रेस व राष्ट्रवादीची होणारी अडचण लक्षात घेता आता दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता फारच धूसर दिसते.

गेल्यावेळी ११ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने यावेळी १३ जागांपर्यंत मजल मारली तर भाजपने नऊ जागा जिंकल्या. हिंदूबहुल भागात कोण जास्त जागा मिळवतो, याविषयी या दोन्ही पक्षामंध्ये मोठी रस्सीखेच होती. त्यात सेना वरचढ ठरली असे म्हणता येईल. असे असले तरी गेल्यावेळी एकही जागा न जिंकणाऱ्या भाजपने यावेळी नऊ जागा मिळवत सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेत नक्कीच महत्व प्राप्त केले आहे. तेरा जागा जिंकणारी सेना व नऊ जागा जिंकणारा भाजप हे परस्परविरोधी पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या आणखी परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्या दोघा पक्षांपैकी कुणाला पाठिंबा देतात, याबद्दलही निकालानंतर उत्सुकता वाढली आहे. सात जागा जिंकणाऱ्या एमआयएम या पक्षाची मदत घेण्यात कोण यशस्वी होतो, हे बघणेही रंजक ठरणार आहे. स्थानिक नेत्यांचे संबंध लक्षात घेता सध्याच्या घडीला काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात. तसे झाले तरी संख्याबळ हे ३७ पर्यंत जाते. बहुमताचा जादुई आकडा गाठणे तरी शक्य होत नाही. अशावेळी एमआयएम या पक्षाची काँग्रेसला मदत घ्यावी लागेल. परंतु, देशपातळीवर काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी निघालेल्या भाजपची त्यामुळे अडचण होईल. शिवाय परस्परविरोधी टोकाची विचारधारा असणाऱ्या एमआयएम सोबत जाणे हेही भाजपला अवघडल्यासारखे होईल.

जर राष्ट्रवादी काँग्रेस व सेना यांची आघाडी झाली तर त्यांचे संख्याबळ हे ४० पर्यंत जाते. त्यांनाही बहुमत गाठणे अवघड होईल. त्यामुळे या आघाडीलाही एमआयएमवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. परंतु, एमआयएममुळे पुन्हा सेनेची अडचण होऊ शकते. अशावेळी एमआयएमला दूर ठेवत सेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस अशी आघाडीदेखील उदयास येऊ शकते. किंवा एमआयएमसारख्या पक्षाला तटस्थ ठेवण्याची खेळी करत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सत्ता समीकरण मांडण्याची शक्यता दिसत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या कौलामुळे सत्तेचा पट मांडताना आता सर्वाची कसोटी लागेल, एवढे मात्र निश्चित.

भाजपचे सर्व मुस्लीम उमेदवार पराभूत

भाजपने यावेळी उभ्या केलेल्या ५६ उमेदवारांमध्ये २७ मुस्लीम उमेदवारांचा समावेश होता. तिहेरी तलाक या मुद्यांमुळे सद्य:स्थितीत मुस्लीम महिला तसेच या समाजातील सुधारणावादी मंडळी भाजपकडे आकृष्ट होत असल्याचा या पक्षाचा दावा आहे. मुस्लीम उमेदवार विजयी झाले तर अन्यत्र देशात आगामी काळात भाजपला राजकीय लाभ होऊ शकतो, असे त्यामागे पक्षाचे गणित होते. मात्र, या २७ पैकी एकही मुस्लीम उमेदवार विजयी होऊ शकला नाही. त्यामुळे भाजपचा हा मालेगाव पॅटर्न यशस्वी होऊ शकला नाही, असे म्हणावे लागेल.