पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या विविध मंत्र्यांच्या भानगडी बाहेर आल्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असली, तरी राष्ट्रवादीने काहीशी सौम्य भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हात दगडाखाली असल्यानेच या पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याचे टाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने केलेल्या २०६ कोटी रुपयांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असला, तरी हे सारे प्रकरण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खोदून काढले होते. मुंडे यांनी सारी कागदपत्रे जमविली होती. पण राष्ट्रवादीने हे प्रकरण तेवढे लावून धरले नाही. पंकजा मुंडे या अडचणीत येणे धनंजय मुंडे यांच्यासाठी महत्त्वाचे होते. यातूनच ही सारी कागदपत्रे काँग्रेस नेत्यांच्या हाती लागल्याची चर्चा आहे. एकाच दिवशी २०० कोटींच्या खरेदीकरिता २४ आदेश काढणे तसेच खरेदी प्रक्रियेत नियमांचे झालेले उल्लंघन यामुळेच भाजपला अडचणीत आणण्याकरिता दिल्लीत काँग्रेसने हे प्रकरण बाहेर काढले. भाजपचे मंत्री गैरव्यवहारांमध्ये गुंतले आहेत हे दाखविण्याकरिता पक्षाचे मुख्य प्रवक्ते अजय माकन यांनीच थेट आरोप केले. मुंबईत लगेचच पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन तक्रारही दाखल केली.
छगन भुजबळ, अजित पवार आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते सध्या अडचणीत आले आहेत. भुजबळ यांच्या विरोधात विविध गुन्हेही दाखल झाले आहेत. सत्ताधारी भाजपने निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीचे नेते अधिक अडचणीत येऊ शकतात. यातूनच बहुधा राष्ट्रवादीने टोकाची भूमिका घेण्याचे टाळले असावे, अशी चर्चा आहे.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजपबाबत सौम्य भूमिका घेतली जात नाही, असा दावा केला. दुष्काळ असो वा अन्य प्रश्न, सरकारच्या विरोधात आतापर्यंत राष्ट्रवादीनेच आक्रमक भूमिका घेतल्याचे तटकरे यांचे म्हणणे आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी राज्यभर रास्तारोको आंदोलन केले जाणार असल्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी जाहीर केले.

भ्रष्ट मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण -विखे पाटील
महिला व बालकल्याण खात्यातील २०० कोटींच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत असताना या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थन करणे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.