‘साहेब, मतदारसंघ आपल्याला मिळाला की निवडून आलोच म्हणून समजा’ हा इच्छुकांचा विश्वास लक्षात घेता सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही सोमवारी आश्चर्य वाटले असणार. मुंबई, ठाणे आणि कोकणातील इच्छुक भलतेच आशावादी दिसत होते.
विधानसभेसाठी राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आजपासून सुरू केला. कोकण, मुंबई आणि ठाण्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुंबईतील बहुसंख्य मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. पण मुलाखत देताना अनेक इच्छुकांनी ‘साहेब, मतदारसंघ आपल्याला मिळाला की विजय निश्चित आहे’ असा ठाम विश्वास व्यक्त केला. वास्तविक मुंबईत राष्ट्रवादीची ताकद मर्यादित आहे, तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. विक्रोळीतून मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय दिना पाटील आणि त्यांच्या पत्नी पल्लवी या दोघांनीही उमेदवारी मागितली आहे. जोगेश्वरीमध्ये दिनकर तावडे यांनी यंदा तरी उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा दावा केला. ठाणे शहर मतदारसंघातून नजिब मुल्ला व हणमंत जगदाळे यांनी उत्सुकता दर्शविली.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने श्रीवर्धन मतदारसंघात त्यांच्या घरातीलच कोणाला तरी उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट आहे. पण त्यांच्या घरातील कोणीच अर्ज केलेला नाही.  

राष्ट्रवादीची अयोग्य कृती – माणिकराव ठाकरे
काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळत गेल्या वेळी लढलेल्या १७४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पण राष्ट्रवादीने  २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आघाडीची चर्चा सुरू असताना  सर्व मतदारसंघांतील मुलाखती घेतल्याने राष्ट्रवादीच्या मनात काय घोळत आहे, असा सवालही ठाकरे यांनी केला.