अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची गुरूवारी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागली. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राजभवनावर जाधव यांना मंत्रीपदाची आणि गुप्ततेची शपथ दिली. मात्र खातेवाटपाचा घोळ रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनिल तटकरे यांनी कालच जलसंपदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून आज सकाळी त्यांचा शपथविधी पार पडला. जाधव यांच्याकडे अद्याप कोणतेही खाते सोपविण्यात आलेले नाही. तटकरे यांचे जलसंपदा खाते कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तर कामगार खात्याची जबाबदारी जाधव यांच्याकडे किंवा अन्य काही मंत्र्यांच्या खात्यामध्येही बदल करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र रात्री उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता.