कोणतीही गुंतवणूक विचाराने आणि नियोजनपूर्वकच व्हायलाच हवी. त्यानंतर गुंतवणुकीसाठी सुयोग्य पर्याय कोणता हा प्रश्न येतो. स्वत:चा अभ्यास, शिस्त आणि ध्यास हे गुण तर प्रत्येक गुंतवणुकीत आणि कर्ज व्यवहारात महत्त्वाचेच ठरतात, असा कानमंत्र ‘लोकसत्ता’च्या ‘अर्थब्रह्म’ या गुंतवणूकविषयक वार्षिकांकाच्या शुक्रवारी झालेल्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित गुंतवणूकदार शिबिराच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने दिला.
मराठी माणसाची पैशाबाबत मानसिकता बँकेतील मुदतठेवी व सोन्यापुरतीच मर्यादित असते. मात्र आता ही मानसिकता बदलत असल्याचे दिसत असून, आज या कार्यक्रमाला जमलेली मोठी गर्दी ही त्याचीच साक्ष असल्याचा दाखला देत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
पत मानांकन अहवालात एखाद्याची पत जितकी चांगली, तितकी त्याला कर्ज मिळण्याची शक्यता अधिक. दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘सिबिल’ने आजवर ३५ कोटी कर्जदारांची माहिती संकलित केली असून ती दर महिन्याला अद्ययावत होत असते. पूर्वी कर्ज घेण्याची प्रवृत्ती नव्हती आणि बँकेकडून कर्ज मिळेल की नाही याबाबत धाकधूक वाटायची. आता मात्र ग्राहकवाद वाढल्यामुळे विविध वस्तू विकत घेणे, प्रवास, उच्च शिक्षण इ. कारणांसाठी कर्ज घेतले जाते. हे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची माहिती एकाच सिबिल अहवालात मिळत असल्यानेच बँका झटपट कर्ज देऊ शकतात, असे याप्रसंगी बोलताना ‘सिबिल’ या ऋण संदर्भ संस्थेच्या ग्राहक संबंध विभागाच्या उपाध्यक्ष हर्षला चांदोरकर यांनी सांगितले. ग्राहकांना दिला गेलेला ‘क्रेडिट स्कोअर’ चांगला नसेल, तरी क्रेडिट कार्ड्सवरील खर्च केलेल्या पैशाची दर महिन्याला भरपाई करून तो वाढवण्याची संधी असते. कर्ज वेळेत फेडण्याची शिस्त असायलाच हवी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
शेअर बाजार म्हणजे काय हे समजून घेऊन त्याची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. गुंतवणुकीतील भावनेचा भाग कमी करावा. ‘स्टॉप लॉस’ म्हणजे तोटय़ाला पायबंद कुठे घालाायचा हे कळले म्हणजे या गुंतवणुकीतील धोक्यांपासून बचाव होतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत स्वत: अभ्यास करणे महत्त्वाचे असून, आत्मविश्वास असेल तरच गुंतवणूक चांगली होते, असे  प्रतिपादन‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक व कंपनी सचिव अजय वाळिंबे यांनी केले.
 ज्येष्ठ सनदी लेखापाल जयंत गोखले यांनी आपल्या मार्गदर्शनात, आर्थिक नियोजनात आयुष्याच्या टप्प्यावर आपण कुठे आणि कुठल्या परिस्थितीत आहोत याचा विचार करून शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण ठरवावे, असे सांगितले. आपण निवृत्तीला आलोय का, गुंतवणुकीत तोटा झाला तर तो इतर स्रोतांतून भरून काढता येईल का, याचा विचार करून गुंतवणुकीचे नियोजन करावे. शेअर बाजार हा एक छंद असावा, पण त्याचे व्यसन होऊ नये. अन्यथा प्रवाहात वाहत गेलो तर आपण थांबू शकणार नाही. गुंतवणुकीच्या संदर्भात जोखीम पातळीत जे बसत नसेल, ते करू नये अशा ‘टिप्स’ गोखले यांनी दिल्या.
तज्ज्ञांशी संवादाची पुन:संधी
‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे प्रकाशन आणि गुंतवणूकविषयक मार्गदर्शन चर्चासत्र या कार्यक्रमास वाचकांची अलोट गर्दी झाली. सभागृह पूर्ण भरले. त्यामुळे अनेकांना परत जावे लागले. त्याबद्दल ‘लोकसत्ता परिवारा’तर्फे आम्ही दिलगीर आहोत. मात्र वाचकांना या कार्यक्रमाचा लाभ पुन्हा घेता येईल. रविवारी, २७ जुलै रोजी वाशी सेक्टर ६ येथील मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाने कार्यक्रमास प्रवेश दिला जाईल, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.