‘‘नाटकासाठी व्यावसायिक रंगभूमी हा एकमेव पर्याय असता कामा नये. नाटकाच्या वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहण्यासाठी वेगळ्या व्यासपीठाची गरज असून त्यामुळे मराठी रंगभूमीवर समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र चळवळ उभारण्याची गरज आहे,’’ असे मत राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएसडी) संचालक वामन केंद्रे यांनी रविवारी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागीय अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले. नाटकाच्या रूढ कल्पनेला प्रश्न विचारणाऱ्या, नवे प्रयोग करणाऱ्या तरुणाईला राज्यस्तरीय व्यासपीठ हवे होते, ते ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या रूपाने मिळाले आहे, अशा शब्दांत केंद्रे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
देशात महाराष्ट्र हे एकमात्र असे राज्य आहे की, येथे गेली पावणेदोनशे वर्षे नाटकाची परंपरा जिवंत ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेच्या माध्यमातूनही दरवर्षी सुमारे साडेचारशे नवीन नाटके सादर होत आहेत. जगातील हे असे एकमेव उदाहरण आहे. व्यावसायिक रंगभूमी हा मराठी रंगभूमीची मुख्य बाजारपेठ असली तरी मराठी रंगभूमीचे वेगवेगळे चेहरे लोकांपुढे आणण्याचे काम ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतून होत आहे. नाटकाची वेगवेगळी वळणे या निमित्ताने समोर येत आहेत.
नाटक हे केवळ शब्द किंवा दृश्यप्रधान नसावे तर नाटकात या दोन्ही गोष्टी असाव्यात. नाटकाने प्रेक्षकांना विचार करायला आणि त्याच वेळी प्रेक्षकांच्या मनात नाटकाचा खेळ सुरू करायला पाहिजे. नाटक हे सर्व अर्थाने प्रेक्षकांना अभिरुचीसंपन्न करणारे असले पाहिजे.
‘लोकांकिका’ हे नाव समर्पक
जनमानसाचे विचार या एकांकिकांमधून प्रतिबिंबित होत आहेत. त्यामुळे लोकांची एकांकिका ती ‘लोकांकिका’ असे नमूद करत ‘लोकांकिका’ या नावाचे कौतुक केंद्रे यांच्यासह परीक्षकांनीही केले.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत यंदा राज्यभरातून १०६ एकांकिका सादर झाल्या. पुढच्या वर्षी त्या २५० होतील तर त्याच्या पुढच्या वर्षी ही संख्या पाचशेपर्यंत पोहोचेल. कारण महाराष्ट्र हे सर्जनशील ‘वेडय़ां’चे राज्य आहे, असा विश्वासही केंद्रे यांनी या वेळी व्यक्त केला.
‘लोकसत्ता लोकांकिका’ दिल्लीत भरवा
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा दिल्लीतही जरूर घ्यावी. राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाकडून त्यासाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल. तुम्ही दिल्लीत या, तुमचे स्वागत आहे, अशी सूचनाही केंद्रे यांनी केली.