देशाचा कायापालाट घडवून आणण्यासाठी देशातील शास्त्रज्ञांनी सहाकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शनिवारी मुंबईतील इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकार स्वत:ची जबाबदारी नक्कीच पार पाडेल. मी जेव्हा देशामध्ये उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याची भाषा करतो त्याचवेळी मला देशातील संशोधन आणि विकासाकडेही तितकेच लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नरेंद्र मोदींनी संशोधनसाठी निधी मिळण्यात होणारा उशीर आणि जागतिक परिषदांना उपस्थित राहण्यासाठी पार पाडाव्या लागणाऱ्या सरकारी सोपस्कारांवरून करण्यात येणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले. देशातील शास्त्रज्ञांनी सरकारी प्रक्रिया आणि व्यवस्थेची चिकित्सा करण्यापेक्षा विज्ञानातील नवनवीन रहस्ये उलगडणे, आम्हाला अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच दिवस चालणाऱ्या या विज्ञानाच्या मेळाव्याला देशभरातून १२ हजारांहून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी जगभरातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक एकत्र येणार आहेत. केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल के. विद्यासागर राव आदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.