अमोघ वाणी आणि उत्कृष्ट शैलीच्या माध्यमातून जगभरात शिवचरित्र पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘वक्तृत्व हा परफॉर्मन्स आहे’ असे सांगत वक्तृत्व कलेसाठी आत्मविश्वासाची आणि अभ्यासाची जोड हवी, असा कानमंत्र दिला. त्यांच्या भाषणाने ‘महाराष्ट्राचा वक्ता दशसहस्र्ोषु’ची निवड अनुभवण्यासाठी आलेले श्रोते मंत्रमुग्ध झाले. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने शनिवारी पार पडलेल्या ‘लोकसत्ता’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील नऊ वक्त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, वक्तृत्व ही कला आहे. त्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहेच. मात्र तो फुकाचा नसावा. त्याला अभ्यासाची जोड द्यावी. ‘अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकून घ्यावे,  उगाच प्रकटोनि नासावे, बरे नव्हे’ ही रामदासोक्ती उद्धृत करत बाबासाहेबांनी वक्तृत्वाचा अभ्यास कशा प्रकारे व किती खोलवर करावा लागतो याचे साद्यंत दर्शन घडवले. वक्ता हा नट असावा लागतो, वक्तृत्वामध्ये नाटय़ असावे लागते असे सांगतानाच श्रोत्यांना गृहीत न धरण्याचा सल्ला त्यांनी तरुण स्पर्धकांना दिला.
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई यांच्या स्मृतींनी, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे यांच्या वक्तृत्वाच्या आठवणींनी सारा माहोलच बाबासाहेबांनी प्रेरणादायी केला. थेट सावरकरांसमोर त्यांची नक्कल करून दाखवणाऱ्या बाबासाहेबांना सावरकरांनी दिलेला सल्ला त्यांनी आजच्या पिढीलाही दिला. तुम्ही नक्कल करा मात्र आयुष्यभर दुसऱ्याची नक्कल करत राहू नका. मर्यादा सोडू नका. भरपूर अभ्यास करा. उत्तमोत्तम वक्त्यांची भाषणे ऐका असा वडीलकीचा सल्ला देणाऱ्या बाबासाहेबांच्या रूपात संपूर्ण श्रोतृवर्गाला महाराष्ट्राच्या उत्तम वक्त्यांच्या मांदियाळीतील एका ताऱ्याचे दर्शन घडले.

वक्ता हा नट असावा लागतो, वक्तृत्वामध्ये नाटय़ असावे लागते. वक्त्यांनी श्रोत्यांना गृहीत धरू नये. तसेच वक्तृत्व सुधारण्यासाठी भरपूर अभ्यास करा.
– बाबासाहेब पुरंदरे