नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी आता मुंबईतील नियंत्रण कक्षातून ‘हॅम’ रेडिओ प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला असून दोघांशी या माध्यमातून संपर्क झाला.
    राज्यातून गेलेले बहुतेक सर्व पर्यटक सुखरुप असल्याचे आणि परतण्यास सुरुवात झाल्याचे नियंत्रण कक्षातील सूत्रांनी सांगितले. विमान उपलब्ध होईल, त्यानुसार हे पर्यटक येत असून पुढील दोन दिवसांत सर्वजण येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दळणवळण यंत्रणेतील अडचणी, मोबाईल व लँडलाईन दूरध्वनी बंद पडणे आणि अन्य कारणांमुळे काही पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सोमवारी सकाळपासून हॅम रेडिओ प्रणालीचा वापर करुन पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. नेपाळमध्येही हॅम प्रणाली वापरली जात असून काठमांडू येथे परदेशी संपर्क साधण्यासाठी दोन केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून १७-१८ ‘व्हीएचएफ’ केंद्रांशी संपर्क साधला जातो. महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती देण्याची विनंती त्यांना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. धुळे येथील डॉ. संजय संघवी आणि आणखी एका पर्यटकाशी या माध्यमातून सोमवारी संपर्क झाला.
मुंबईतील नियंत्रण कक्षाकडे पर्यटकांच्या नातेवाईकांकडून ५०० हून अधिक दूरध्वनी आले असून दिल्लीतील नियंत्रण कक्षाकडे त्याहून खूप अधिक दूरध्वनी आले आहेत. आता बहुतेक पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरुप आहेत.

*  राज्यातून नेपाळला गेलेले पर्यटक- अंदाजे दीड हजार
* सोमवार सायंकाळपर्यंत १०० हून अधिक परतले
* सुमारे ८०० काठमांडू विमानतळावर प्रतीक्षेत
*  अजूनपर्यंत ४० पर्यटकांशी संपर्क नाही