‘आज मौसम भी पुरा दिन रोया है, मेरे देश ने कलाम खोया है’ या शब्दांत ‘समाज माध्यमा’तील ‘नेटिझन्स’नी  भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहिली. गंमत म्हणजे रोज सुप्रभात, ‘गुड मॉर्निंग’ सारख्या संदेशांनी उतू जाणारे हे ‘माध्यम’ विनोद, गप्पा, अन्य माहिती, मनोरंजन अशा साऱ्यांपासूनच शांत राहिले. दिवस भरात फिरणारे संदेश हे अग्निपंखात विसावलेल्या देशाच्या ‘मिसाइल मॅन’ला श्रद्धांजली वाहणारेच होते.
‘समाज माध्यम’ तरुणाईचा महत्त्वाचा आधार बनला आहे.  रोज घडणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा तरुणाई मोठय़ा खुबीने वापर करीत असतो. तरुणांच्यात विशेषत: विद्यार्थिवर्गात डॉ. कलाम हे लोकप्रिय होते ते एक समाज शिक्षक म्हणून. त्यांच्या अकाली निधनाने व्यक्त होण्यासाठी ही तरुणाई आपला शोक व्यक्त करण्यासाठी सरसावली. ‘मेरे देशने कलाम खोया है’ पासून ते ‘कुणी जातो हजला, कुणी काशीला, जनमनास लावुनी चटका पुण्यात्मा गेला एकादशीला’ या शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात आली.
क्षेपणास्र कार्यक्रम, अणू चाचणी, इस्त्रोचा पायारव, विविध अवकाश मोहिमा या साऱ्यांतून कलाम झळकत होते. शिक्षक कलाम, शास्त्रज्ञ कलाम,  राष्ट्रपती कलाम आणि संगीतप्रेमी कलाम अशा त्यांच्या विविध भावमुद्राही या माध्यमावर दिवसभर फिरत होत्या. कलाम यांच्या कार्याची माहिती इतरापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘नेटिझन्स’ची धडपड सुरू होती. आणि त्याच बरोबर पुन्हा पुन्हा हळहळतही होती.