मेल-एक्स्प्रेसच्या अधिकृत तिकीटधारकांसाठी सेवा
रेल्वे प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधांचा लाभ देण्यासाठी भारतीय रेल्वेने कंबर कसली असून आता लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे नवे वातानुकूलित शयनगृह उभारले आहे. याआधी सीएसटी येथे ७४ खाटांचे वातानुकूलित शयनगृह उपलब्ध आहे. त्यात आणखी ७४ खाटांच्या या नव्या शयनगृहाची भर पडली आहे. हे शयनगृह प्रवाशांसाठी खुले झाले असून त्याचे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना लांब पल्ल्याचे आरक्षित तिकीट जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच या शयनगृहातील खाट ऑनलाइन आरक्षित करण्यात येणार आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून दर दिवशी अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटतात. दर दिवशी लाखो प्रवासी येथून देशाच्या विविध भागांमध्ये जातात आणि मुंबईत येतात. अशा प्रवाशांना अत्यल्प दरात उत्तम सुविधा मिळावी, यासाठी रेल्वेने गरजू प्रवाशांसाठी वातानुकूलित शयनगृह सुरू केले. या शयनगृहात पुरुषांसाठी ५४ आणि महिलांसाठी २० खाटांची सोय आहे. याआधीही एवढय़ाच खाटांचे शयनगृह सीएसटी येथे असून या शयनगृहात १०० टक्के आरक्षण नेहमीच असते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.हे नवीन वातानुकूलित शयनगृह लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या प्लॅटफॉर्मजवळ असलेल्या जनआहार कॅफेटेरियाच्या वर तिसऱ्या मजल्यावर आहे. या शयनगृहाच्या आरक्षणासाठी प्रवाशांकडे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षित तिकीट असणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन तेथे आरक्षण करावे लागणार आहे. १२ तासांच्या कालावधीसाठी १५० रुपये आणि २४ तासांच्या कालावधीसाठी २५० रुपये असे दर आहेत. तसेच हे शयनगृह जास्तीतजास्त ४८ तासांसाठी एका प्रवाशाला वापरता येणार आहे, असेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.