प्रवाशांना दिलासा; निविदा प्रक्रिया फेब्रुवारी २०१८मध्ये

तिकिटांच्या रांगेत तासन्तास उभे राहून प्रवाशांना बराच वेळ खर्ची करावा लागत असतानाचा त्यातून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून एटीव्हीएम यंत्रे प्रवाशांच्या सेवेसाठी आणण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ तिकीट मिळण्यास मदत होत गेली. मात्र प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि एटीव्हीएम यंत्राचा वाढलेला वापर यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर आणखी ३१८ नवी यंत्रे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असून फेब्रुवारी २०१८ पर्यंत सर्व यंत्रे रेल्वेच्या बहुतांश स्थानकावर बसवण्यात येतील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बरवर २०१०-११ मध्ये एकूण ३८ लाख प्रवासी प्रवास करत होते. हीच संख्या सध्याच्या घडीला ४० लाख झाली आहे. त्यामुळे तिकीट यंत्रणेवरही मोठा ताण पडतो. काही वर्षांपूर्वी तिकीट खिडक्यांसमोर असणाऱ्या रांगेत तासंतास उभे राहून प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत असे. त्यामुळे बराच वेळ प्रवाशांना खर्ची करावा लागत असे. यातून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेवरील स्थानकांवर एटीव्हीएम यंत्रे बसवण्यात आले. यंत्रावर स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना त्वरित तिकीट प्राप्त होत असल्याने प्रवाशांचा बराच वेळ वाचू लागला. तिकीट मिळवण्याचा सोपा मार्ग रेल्वेकडून उपलब्ध करण्यात आल्याने त्याचा वापर वाढू लागला. सध्याच्या घडीला ४२९ यंत्रे मध्य रेल्वेवरील लोकल स्थानकांवर आहे. मात्र या यंत्रांचा वापर अधिकाधिक वाढू लागल्याने यातील ६२ यंत्रे नादुरुस्त झाली आहेत. त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर ४२९ एटीव्हीएम यंत्रे असल्या तरी जून २०१८ पर्यंत यातील १२९ यंत्रांची मुदत संपत असून त्याऐवजी आणखी काही यंत्रे आणण्याचे पुन्हा नियोजन केले जाईल.

जादा यंत्रे का?

मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावरील स्थानकांवर काढल्या जाणाऱ्या एकूण तिकिटांपैकी २२ टक्के तिकीट ही एटीव्हीएम यंत्राद्वारेच काढली जातात, तर एक रुपया जादा देऊन तिकीट सेवा घेणाऱ्या जेटीबीएसचा वाटा हा १५ टक्के, तर ६० टक्क्य़ांहून अधिक तिकिटे ही तिकीट खिडक्यांवर काढली जात असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच एटीव्हीएम यंत्राचा वापर वाढलेला दिसतो. त्यामुळे ही यंत्रे कमी पडतानाच बिघाडाचे प्रमाणही वाढत जात आहे आणि त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी ३१८ नवीन यंत्रे घेण्यात येणार आहेत. ही यंत्रे फेब्रुवारी २०१८ पर्यंत टप्प्याटप्यात स्थानकांवर बसवली जातील.

यंत्रे कोणत्या स्थानकांवर?

सीएसएमटी, मस्जिद, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी ते ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर,  हार्बर व ट्रान्स हार्बरवरील सर्व स्थानकांवर. सिद्धार्थ कॉलनीला पुनर्विकासाची प्रतीक्षा