कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रीडमध्ये या रुग्णालयाचा समावेश करावा यासाठी येत्या आठवडाभरात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
नागपूर शहरातील विविध प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत नागपूर शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. नाग आणि पिली नद्यांमधून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी प्रदूषित होत असल्याचे आढळून आले असून हे पदूषण कमी करण्यासाठी केंद्राला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल. तसेच या दोन्ही नद्यांचा राष्ट्रीय नदी सवंर्धन प्रकल्पांतर्गत विकास करण्यासाठी ११८ कोटींचा प्रस्ताव केंद्रास पाठविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्ताना पर्यायी भूखंड वाटपाची प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूसंपादनही याच कालावधीत पूर्ण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरी कमाल जमीन धारणा कायद्याची प्रक्रिया पूर्ण न करता चुकीच्या पद्धतीने या जमीनीवर सरकारचे नाव लावण्यात आले असेल तर ते त्वरित काढून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. अनाधिकृत ले आऊट असलेल्या आणि या पूर्वीच मोठय़ाप्रमाणात बांधकाम झालेल्या भूखंडांवरील आरक्षणे रद्द करण्याची मागणी खासदार विलास मुत्तेमवार यांनी यावेळी केली. त्यावर ही बाब तपासून योग्य निर्णय घेण्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली.