स्वित्र्झलडमधील दावोस या ठिकाणी सध्या जागतिक आर्थिक परिषदेला हजर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळा पैसा स्वीकारू नये, या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून भाजप-शिवसेनेत नव्याच वादाला तोंड फुटले आहे. कदमांच्या या वक्तव्यावरुन भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनीच त्याबाबत खुलासा करावा, अशी मागणी करीत, काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे.  
भाजप सरकारमध्ये शिवसेनेला सहभागी होऊन काही दिवस उलटले असताना या दोन पक्षांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही शेपूट घातलेले नाही, प्रसंगी सरकारविरोधी संघर्ष करू, असा भाजपला इशारा दिला आहे. तर, सरकारच्या स्थैर्यासाठी सत्तेत सहभागी होण्याची गरज नसते, असे विधान करत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. सत्तेते एकत्र असूनही युतीत  शीतयुद्ध सुरु झाले आहे.
शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी  मुख्यमंत्र्यांना काळा पैसे स्वीकारु नका, असा सल्लावजा इशारा दिल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या संदर्भात दूरध्वनीवरुन अनेकदा प्रयत्न करुनही रामदास कदम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्यांने मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य केल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.