निश्चलनीकरणानंतर हवाला बाजारात नवे संकेतशब्द!

निश्चलनीकरणानंतर जुन्या नोटांचे नव्या नोटांत रूपांतर करण्याचा धंदाही तेजीत असल्याचे सांगितले जाते. २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत दलाली आकारून नव्या नोटा देणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. हवाला

बाजारही बऱ्यापैकी तेजीत आला असला तरी प्राप्तीकरण विभागाच्या कचाटय़ात सापडू नये, यासाठी नवे संकेतशब्द या निमित्ताने अमलात आले आहेत.

‘गार्डन’मे कितने ‘फ्लॉवर’ है.. असा कोड सध्या खूपच रुळू लागला आहे. याचा अर्थ नेमका काय आहे हे शोधून काढताना गुप्तचर यंत्रणांच्या नाकीनऊ आले. परंतु निश्चलनीकरणाच्या २५ दिवसांनंतर त्याचा अर्थ शोधण्यात आला आहे. गार्डन म्हणजे तिजोरी तसेच फ्लॉवर म्हणजे रुपये.. म्हणजे तुमच्याकडे असलेले किती रुपये नव्या नोटांच्या स्वरूपात हवेत, असा त्याचा अर्थ असल्याचे आता उलगडले आहे.

ज्याच्याकडे जुन्या नोटा आहेत त्याला गार्डनर (माळी) आणि ज्याला नोटा बदलून द्यायच्या आहेत त्याला प्रिस्ट (पुजारी) असे संबोधले जात आहे.

पाचशेच्या जुन्या नोटेसाठी यलो फ्लॉवर तर नव्या नोटासाठी ग्रीन वेजिटेबल्स तर हजाराच्या जुन्या नोटेसाठी रेड रोझ आणि नव्या नोटेसाठी पिंक पेपर हे कोड प्रचलित झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या कोडचा वापर सध्या मोबाइलवर बोलताना वापरले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नोटा बदली करण्यात महत्त्वाची भूमिका विमानतळ, रेल्वे, वीज देयक केंद्रे आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी बजावत होते. तेही या कोडचा वापर करीत होते.

गुप्तचर यंत्रणा सतर्क

२ डिसेंबर रोजी विमानतळ आणि पेट्रोल पंपावर जुन्या नोटा घेण्यास बंदी घातली गेल्यानंतर आता रेल्वे आणि वीज देयक केंद्रे नोटा बदली करून मोठी भूमिका बजावत असल्यामुळे या मंडळींवर गुप्तचर यंत्रणाही लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या कोड भाषेचा वापर केला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग?

काही बँक कर्मचारीही मोठय़ा प्रमाणात नोटा बदलून देत असल्याची माहितीही यंत्रणेला मिळाली आहे. काही बँक कर्मचाऱ्यांनी घरपोच सेवाही दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ती आपल्याला कळवावी, अशा आशयाचे पत्रच प्राप्तिकर विभागाने पोलिसांना लिहिले आहे.

नवे संकेत असे आहेत..

  • ५०० : जुन्या नोटा – यलो फ्लॉवर; नव्या नोटा – ग्रीन वेजिटेबल्स
  • १००० : जुन्या नोटा – रेड रोझ; नव्या नोटा – पिंक पेपर