राज्यभरात १६ वाढीव ठिकाणी सुविधा

राज्यातील २७ लाख अपंग रुग्णांच्या तुलनेत अपंगत्व प्रमाणपत्र देणारी ५४ रुग्णालये अपुरी असल्याने यामध्ये १६ रुग्णालयांची वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई ठाणे या महानगरपालिकाअंतर्गत येणाऱ्या काही रुग्णालयांमधून आता अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सध्या राज्यभरातील १६ वैद्यकीय महाविद्यालये, ३६ सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णालये व मुंबइतील हाजीअली येथील केंद्र शासनाची ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन, वांद्रे येथील आलियावर जंग इन्स्टिटय़ूट कर्णबधिर विकलांग संस्था अशा एकूण ५४ रुग्णालयांमार्फत अपंग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र सॉफ्टवेअर असेसमेंट ऑफ डिसॅबिलिटी या संगणक प्रणालीच्या माध्यमातून देण्यात येतात. परंतु राज्यभरातील अपंगाच्या संख्येच्या तुलनेत ही सुविधा अपुरी पडत असल्याने या सुविधेचा विस्तार करण्याच्या हेतूने रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या के.ई.एम, जी.एस. मेडिकल महाविद्यालय, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, शीव रुग्णालय, नायर रुग्णालय, कुपर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयांमध्ये अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध असणारे जे.जे. रुग्णालय अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अपुरे होते. त्यामुळे आम्ही शासनाकडे ही सुविधा वाढवून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहोत. २०१६ च्या कायद्यानुसार अपंगाच्या व्याख्येमध्ये २१ प्रकारच्या अपंगत्वाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अध्ययन अक्षमता, ऑटिझम, सिकल सेल आदी आजारांचीदेखील गणना करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये अपंगाच्या संख्येतही वाढ झाली आहे. तेव्हा आता या वाढीव रुग्णालयांच्या सुविधेमुळे अपंगासाठीच्या योजनांचा लाभ अधिकाधिक अपंग व्यक्तींना घेणे शक्य होणार आहे, असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अपंग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर यांनी सांगितले आहे.

प्रमाणपत्र देणारी नवी रुग्णालये

  • मुंबई – के.ई.एम., जी.एस. मेडिकल महाविद्यालय, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, शीव रुग्णालय, नायर रुग्णालय, कुपर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय
  • पुणे – कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना येथील डॉ. कोटनीस रुग्णालय
  • नागपूर – इंदिरा गांधी रुग्णालय, सीडीआरसी रुग्णालय
  • नाशिक – बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय
  • ठाणे – छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय
  • नवी मुंबई – जनरल रुग्णालय, वाशी