ताशी १२० किमी वेगाने धावणाऱ्या आणि अत्याधुनिक बनावटीच्या लोकलगाडय़ांतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पुढील सहा महिने तरी पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे. या गाडय़ा बनवण्याचे काम देण्यात आलेल्या बम्बार्डीअर कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यासाठी मागवलेल्या दोन गाडय़ा अद्याप पाठवलेल्या नाहीत. त्यामुळे मध्य आणि पश्चिम उपनगरी रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ७२ नव्या गाडय़ांचे वेळापत्रकही पुरते विस्कटले आहे.
जर्मनीच्या बम्बार्डीअर कंपनीकडून मुंबईच्या उपनगरी रेल्वेच्या नव्या गाडय़ा तयार करण्यात येत आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जर्मनीच्या या कंपनीबरोबर नव्या आधुनिक गाडय़ा बनविण्याबाबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार ७२ नव्या गाडय़ा मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळणार आहेत. या गाडय़ा टप्प्याटप्प्याने येणार असून पहिल्या दोन गाडय़ा नोव्हेंबर महिन्यात मुंबईत येणे अपेक्षित होते. तथापि, या गाडय़ा अद्याप तयार झाल्या नसल्याचे सांगण्यात येते. या दोन्ही गाडय़ा नोव्हेंबपर्यंत मुंबईत आल्या असत्या तर त्यांची चाचणी होऊन या गाडय़ा मार्चपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्या असत्या. आता या गाडय़ा अद्याप आल्या नसल्यामुळे पुढील सर्व वेळापत्रक लांबणीवर पडले असून किमान सहा महिने नव्या गाडय़ा येण्याच्या प्रक्रियेला खीळ बसणार आहे. बम्बार्डीअर कंपनीकडून अत्याधुनिक बनावटीच्या या गाडय़ांची किंमत प्रत्येकी ४० कोटी रुपये इतकी आहे. या गाडय़ांचा वेग प्रतितास १२० किमी इतका असून सध्या वापरात असलेल्या सिमेन्स कंपनीच्या गाडय़ांचा वेग १०० किमी इतका आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात या गाडय़ा आल्या तर डहाणू-चर्चगेट थेट उपनगरी सेवेसाठी या गाडय़ा उपयुक्त ठरतील, असे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. डिसेंबर २०१५ पर्यंत ७२ नव्या गाडय़ा  रेल्वेला मिळणार आहेत.