नवी मुंबई विमानतळ कामात भाग घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय निविदाकरांना केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्रालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून विमानतळ परिचालनामध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. त्यामुळे उड्डाण परिचलानामध्ये तोटा झाल्यास तो तोटा पर्किंग सारख्या  स्थानिक पातळीवरील सेवांमधून भरुन काढण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जगातील निविदाकार या प्रक्रियेत भाग घेऊ शकणार आहेत.
विमानतळाची निविदा दोन वेळा पुढे ढकलण्याची वेळ सिडकोवर आली आहे. दोन हजार ३६२ हेक्टर जमिनीवरील या महत्वाकांक्षी प्रकल्पावर १५ हजार कोटी खर्च होणार असून प्रकल्पग्रस्तांचा विरोध, पर्यावरणाचा आडकाठी यामुळे हा प्रकल्प रखडला होता. सिडकोने टाकलेल्या काही अटीमुळे या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय निविदाकार भाग घेण्यास कचरत होते. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. त्यामुळे उड्डाण आणि स्थानिक परिचलन हे दोन भाग वेगळे करण्यात आले आहेत.