नवी मुंबई पालिका निवडणुकीतील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची संयुक्त सभा शनिवारी कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शाळेच्या मैदानावर होणार आहे, तर दुपारी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात उमेदवारांचा उत्साह वाढविणार आहेत.
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करावे येथील तांडेल मैदानात जंगी सभा आयोजित करण्यासाठी भाजप कार्यकर्ते कामाला लागले असून, त्यांच्या सोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई राहणार आहेत. याच दिवशी सानपाडय़ात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही एक सभा होणार
आहे.
नवी मुंबई पालिका निवडणुकीतील मतदान २२ एप्रिल रोजी होणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. अडीच हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाऱ्या पालिका तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात कायम राहाव्यात यासाठी राष्ट्रवादी, तर त्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातातून खेचून घेण्यासाठी शिवसेना, भाजप आणि काँग्रेस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी शेवटच्या दोन दिवसांत राज्यस्तरीय नेते मैदानात उतरले असून, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी काही प्रभाग पिंजून काढले. सोमवारी संध्याकाळी प्रचार थंडावणार असून, शेवटच्या पाच दिवसांतील शनिवार-रविवारी या दोन दिवसांत प्रचाराला उधाण येणार आहे.