पुणे, नाशिक येथील प्राथमिक फेरीत वैविध्यपूर्ण कलाविष्कार

आज नाशिक विभागातील प्राथमिक फेरीचा दुसरा दिवस

राज्यभरातील महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची लाट महाराष्ट्रभरात पसरली असून महाराष्ट्रातील आठ केंद्रांवरील प्राथमिक फेरी पार पडत आहे. रविवारी पुणे आणि नाशिक या केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडली. नाशिक केंद्रावर सोमवारी आठ एकांकिका सादर होणार असून त्यानंतर नाशिकच्या विभागीय अंतिम फेरीत सादर होणाऱ्या एकांकिकांची निवड केली जाणार आहे. मात्र या तीनही केंद्रांवरील एकांकिकांचे विषय, त्या विषयांमधील वैविध्य, सादरीकरणाची पद्धत या सगळ्याच गोष्टींमुळे या सर्व एकांकिका खास ठरल्या.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी पुणे आणि नाशिक या तीनही केंद्रांवर पार पडली. पुण्यातील प्राथमिक फेरी सदाशिव पेठेतील नूतन मराठी विद्यालय मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे झाली. महाकवी कालिदास नाटय़मंदिर येथे होणारी नाशिक विभागातील प्राथमिक फेरी रविवार झाली, तर आज, सोमवारी ही फेरी होत आहे. आता या विभागांतून निवडलेल्या निवडक एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर होणार असून त्यांपैकी एक-एक एकांकिका महाअंतिम फेरीत निवडली जाणार आहे.

कॉर्पोरेट घुसमट
नाशिकमधील तरुण कलाकारांनी सेझ, व्यसनमुक्ती, विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार, कॉर्पोरेट स्तरावर होणारी महिलांची घुसमट, संवेदना बोथट झाल्यावर येणारा निगरगट्टपणा अशा विविध विषयांची सुरेख मांडणी केली.

रत्नागिरीतील विभागीय अंतिम फेरी १० ऑक्टोबरला
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेची रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. याआधी ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या अंतिम फेरीच्या दिवशीच रत्नागिरीतील काही महाविद्यालयांच्या परीक्षा असल्याने या महाविद्यालयांच्या विनंतीवरूनच हा बदल करण्यात आला आहे. आता १० ऑक्टोबर रोजी कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सभागृह येथे दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत रंगणार आहे. या अंतिम फेरीतून एक एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत कोकण विभागाचे नेतृत्त्व करेल.