राष्ट्रवादी-भाजप-सेनेच्या संभाव्य युतीची चाचपणी
चिपळूण मुक्कामी उद्यापासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवाखाली राज्यातील भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काँग्रेस वगळून भाजप-सेनेच्या आमदारांचीच फक्त विकास निधीतून वर्गणी घेण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची तीच चाल असल्याचे बोलले जाते. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे आणि निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाचे चित्र छापण्यावरून उठलेल्या वादळानंतरही राष्ट्रवादीने हे संमेलन तडीस नेण्याचा चंग बांधला आहे. या साऱ्या वादाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संमेलनाला उपस्थित राहण्याबाबत अनिश्चिता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यासपीठाला बाळासाहेबांचे नाव देण्याच्या निर्णयाचे जाहीर समर्थन केल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री व नेते संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागले. शिवसेनेने पुष्पा भावे यांना रत्नागिरी जिल्हा बंदीचा इशारा दिल्यानंतर, पोलिसांनीच भावे यांचा कार्यक्रम रद्द करून टाकला. त्यावर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी वाद घालण्यापेक्षा संमेलन यशस्वी झाले पाहिजे, असा सूर आळवत पवारांच्याच भूमिकेचे समर्थन केले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे सारे वाद अंगावर घेऊन संमेलनाच्या आडून कोकणातील आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी काँग्रेसपेक्षा विरोधी नेत्यांना व लोकप्रतिनिधींना जवळ केले. त्यांच्याच पुढाकाराने संमेलनासाठी आमदारांच्या विकास निधीतून ७५ लाख रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. विकास निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची वर्गणी देणारे  १५ आमदार राष्ट्रवादी, भाजप व सेनेचेच आहेत. त्यात राष्ट्रवादीचे मंत्री सुनील तटकरे, गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार प्रकाश बिनसाळे, निरंजन डावखरे, उदय सामंत, दीपक केसरकर, सुरेश लाड, नरेंद्र पाटील व किरण पावस्कर, भाजपचे प्रमोद जठार, शिवसेनेचे सूर्यकांत दळवी तसेच क्षितीज ठाकूर व गणपत गायकवाड या अपक्ष आमदारांचा समावेश आहे. विधान परिषदेचे आमदार सुभाष चव्हाण व भाई जगताप कोकणातील असूनही त्यांची वर्गणी घेतलेली नाही. सुभाष चव्हाण यांनी आमदार निधीतून पाच लाख रुपये देण्यासाठी पत्र दिले होते, परंतु त्यांचा निधी घेतला नसल्याचे त्यांनीच सांगितले. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्य़ात काँग्रेसला वगळून शिवसेना-भाजपला हाताशी धरून या पूर्वी अनेक राजकीय प्रयोग यशस्वी केलेले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भविष्यातील नव्या राजकीय समिकरणाची राष्ट्रवादीची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.  
दरम्यान, संमलनाच्या समारोपासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. परंतु मुख्यमंत्री या संमेलनाला जाण्याची शक्यता कमी आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.