तरुण संशोधकाला मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ बंगल्यावर एरव्ही राजकारण्यांची वर्दळ असते. पण, या बंगल्यावरची शनिवारची सकाळ जरा वेगळी होती. बंगल्यावर एका तरुण संशोधकाचे संशोधन मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीरपणे ऐकत होते. काडेपेटीच्या आकाराच्या इसीजी मशीनची (रिमोट कार्डियॅक डायग्नोस्टिक सिस्टिम) माहिती या तरुणाच्या तोंडून ऐकताना मुख्यमंत्री भारावून गेले आणि त्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला.

यवतमाळ जिल्ह्यतील महेश मुकेश गलगलीकर या तरुण अभियंत्याने  अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना वैद्यकीय क्षेत्रासाठी इलेट्र्निक उपकरणांच्या संशोधनात स्वत:ला झोकून दिले. त्याने केलेल्या संशोधन प्रकल्पाला, तसेच व्यावयासायिक उत्पादन प्रबंधला पुरस्कारही मिळाला. एमएस मायक्रो इलेट्रॉनिक्स केल्यानंतर त्याने थोडा काळ काही कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला. संशोधनात मन रमणाऱ्या या तरुणाने हृदयविकार, अतिदक्षता विभाग आदी वैद्यकीय क्षेत्रात कोणत्या प्रकारची इलेट्रॉनिक्स उपकरणे विकसित करता येतील, यावर संशोधन सुरू केले. २०१४ साली त्याने अमेरिकेत ‘मेसिओ’ नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत काडेपेटीच्या आकाराचे इसीजी मशीन त्याने तयार केले. सामान्य इसीजी मशीनपेक्षा त्याची परिणामकारता जास्त असून, सलग काही दिवस ते मॉनिटरिंग करू शकते. त्याचप्रमाणे अतिदक्षता विभागात लागणारी अनेक उपकरणेही त्याने काडेपेटीपेक्षा थोडय़ा मोठय़ा आकारातील इलेट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विकसित केली असून, त्याद्वारे एकाचवेळी ऑक्सिजन सॅच्युरेशन, रक्तदाब, शरीराचे तापमान घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्टार्टअप’ला साद देत त्याने पुणे येथे एक कंपनी स्थापन केली. परंतु, पुढे नेमके कोणाला व कसे भेटायचे हा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला. दोन दिवसांनी तो अमेरिकेला परत चालला होता. एका ओळखीतून शुक्रवारी रात्री त्याने मुख्यमंत्र्यांना एक लघुसंदेश पाठवून भेटण्याची विनंती केली आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वेळही दिली. शनिवारी सकाळी ११ वाजता या तरुणाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आणि त्याच्या प्रयत्नांचे सार्थक झाले.

मुख्यमंत्र्यांची ही झटपट कृतीशीलता महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल आणि ‘स्टार्टअप’साठी परदेशातील तरुण मोठय़ा संख्येने पुढे येतील.   महेश मुकेश गलगलीकर, तरुण संशोधक