जामिनास ‘एनआयए’ची हरकत नाही

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यासही आपली काहीही हरकत नाही, अशी भूमिका राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात स्पष्ट केली. ‘एनआयए’च्या या भूमिकेमुळे साध्वी प्रज्ञासिंह हिचा जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साध्वीसह सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण टक्कलकी अशा तिघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यातील साध्वीच्या जामीन अर्जावर न्यायालयाने ‘एनआयए’ला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नुकत्याच दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या पाश्र्वभूमीवर तिची जामिनावर सुटका करण्यास आपली हरकत नाही, असे ‘एनआयए’च्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.  साध्वीविरोधात पुरावे नसल्याचा ‘एनआयए’ने स्पष्ट केले.