माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर शिवसेनेकडून पोस्टर लावून खालच्या भाषेत टीका करण्यात आली होती. शिवसेनेच्या या टीकेला आता माजी खासदार नीलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले. नीलेश राणेंनीही शिवसेनेवर टीका करताना पातळी सोडली आहे. मुंबईत लवकरच पोस्टर लावण्यात येतील, असे निलेश यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना आणि राणे कुटुंबात पोस्टर’वॉर’ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या रंगताना दिसते आहे. मात्र शिवसेनेला नारायण राणेंची ही भूमिका पसंत पडलेली नाही. त्यामुळेच शिवसेनेने वरळीत पोस्टर लावत राणेंवर निशाणा साधला. या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेने राणेंवर पातळी सोडून टीका केली. या टीकेला आता नारायण राणेंचे पुत्र नीलेश राणेंनी त्याच भाषेत उत्तर दिले. ‘दसरा-दिवाळी अंक २०१७’ असे शीर्षक देत त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

शिवसेनेकडून वारंवार भाजपला दिला जाणारा सत्ता सोडण्याचा इशारा, मातोश्री २ ची उभारणी, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अशा अनेक मुद्यांवरुन निलेश राणेंनी शिवसेनेवर शरसंधान साधले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी या सर्व मुद्यांवरुन शिवसेनेवर पातळी सोडून टीका केली. छोटा पेंग्विन असा उल्लेख करुन नीलेश राणेंनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंवरही अप्रत्यक्ष टीका केली. ‘मुंबईभर बॅनर लावून त्याच भाषेत लायकी काढणार,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राणे कुटुंबातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने दोनच दिवसांपूर्वी वरळीत पोस्टर लावून नारायण राणेंवर जोरदार टीका केली. ‘इच्छा माझी पुरी करा’ या शीर्षकाखाली नारायण राणे यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत या पोस्टरच्या माध्यमातून नारायण राणेंवर कडाडून टीका केली होती. राणेंविरोधात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये किमान सभ्यतेच्या मर्यादा ओलांडण्यात आल्या होत्या. या पोस्टरचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी अरविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.