घाटकोपरमधील २१ वर्षीय तरुणाच्या अपहरणप्रकरणी मुंबई पोलिसांनी महिन्याभरानंतर या टोळीच्या नऊजणांना अटक केली. दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्यानंतर त्यांनी मुलाला सोडले होते.
११ मार्च रोजी टिळकनगर येथून या तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. मुंबई गुन्हे शाखेचे विशेष पथक या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. मात्र त्यांना यश आले नव्हते. अखेर मुलाच्या कुटुंबीयांनी दोन कोटी रुपयांची खंडणी दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी १३ एप्रिल रोजी मुलाला सोडून दिले. अपहृत तरुणाचे काका मंत्री असल्याने पोलिसांवर मोठा दबाव होता.
या मुलाच्या चौकशीतून पोलिसांना एक दुवा मिळाला. मनीष नावाच्या आरोपीला मुलगा झाला होता, असे त्यांच्या संभाषणावरून या तरुणाला समजले होते. मग पोलिसांनी मुंबईत ‘मनीष’ नावाच्या कोणत्या व्यक्तीची पत्नी बाळंत झाली, त्याची माहिती मिळवली. विक्रोळीत मनीष नावाच्या एका इसमाच्या पत्नीला मुलगा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी माग काढून आरोपींना जेरबंद केले.
सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की,  पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या मोबाइल फोनने फोन करायचे. त्यांनी या मुलाला मुंबईसह मुरबाड वणी येथे लपवून ठेवले होते. या काळात त्यांनी एकदा मुलाचे चित्रण करून त्याची क्लिप कुटुंबीयांना पाठवली होती, परंतु ते पैसे घेण्यात यशस्वी झाले.  या टोळीचा म्होरक्या ४० वर्षांचा मेकॅनिकल अभियंता असून त्याची पत्नी वकील आहे. यापूर्वी त्यांनी एका व्यावसायिकाचे अपहरण करून १२ लाख रुपयांची, तर ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून ४० लाख रुपयांची खंडणी उकळली होती. परंतु  ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते.
अतिरिक्त पोलीस आयुक्त के.एम.एम.प्रसन्ना, पोलीस उपायुक्त मोहन दहिकर  यांच्या पथकाने ही कारवाई केली.