राज्यमंत्र्यांच्या अधिकारावरून शिवसेना-भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस आता थेट बिहारच्या वेशीपर्यंत पोहोचली आहे. बिहारमध्ये जितन राम मांझी यांच्या कारवायांना भाजपची फूस असल्याचा दावा सेनेच्या मुखपत्रातून केला गेल्यानंतर ‘जदयू’चे नेते नितीशकुमार यांनी आता भाजपला झोडपण्यासाठी शिवसेनेची काठी हाती घेतली आहे. त्यामुळे, अगोदरच बिनसलेल्या सेना-भाजपच्या संबंधांत ‘बिहारी मिठा’चा खडा पडणार असे दिसू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यानंतर लगेचच सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून बिहारच्या मुद्दय़ावरून भाजपला लक्ष्य करण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री जिनत राम मांझी यांना पाठिंबा देऊन भाजप ‘राजकीय पाप’ करत असून, यामुळे राजकारणात अंधार पर्व सुरू होईल, अशा शब्दांत भाजपला फटकारण्यात आले होते. कमिशन घेण्याची जाहीरपणे कबुली देणाऱ्याला उघड पाठिंबा देण्याच्या पापात कुणीही सहभागी असू नये, असे असतानाही, १३० आमदारांचा पाठिंबा असलेल्या नितीशकुमार यांना शह देण्यासाठी भाजप मांझी यांना खेळवत आहे, असा आरोपही ‘सामना’ने केला होता.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार असले, तरी आम्ही केवळ सरकारला स्थैर्य देण्यासाठी सत्तेत सहभागी आहोत, असे सांगून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी याआधीच उघड केली होती. ‘सामना’मध्ये बिहारच्या प्रश्नावरून सेनेने भाजपला झोडपताच, नितीशकुमार यांनी लगेचच सेनेची भलामण सुरू केली आहे. ‘अखेर शिवसेनेने सत्याची बाजू घेतली’ अशा शब्दांत नितीशकुमार यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या या मित्रपक्षाचे अप्रत्यक्ष आभार मानले आहेत. जेव्हा कोणताही पक्ष भाजपसोबत नव्हता, राजकारणात हा पक्ष एकाकी होता, तेव्हापासून शिवसेनेने भाजपसोबत मैत्री कायम ठेवली आहे. मात्र महाराष्ट्रात सत्ता मिळताच भाजपने शिवसेनेचा बळीचा बकरा करून आघाडीच्या राजकारणाचीही मोडतोड केली, असा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे.
भाजपवर सामनामधून केल्या जाणाऱ्या टीकेमुळेच याआधी अनेकदा भाजपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी नोंदविली होती. मात्र आता सरकारमध्ये सहभागी असतानाही सेनेतून सुरू असलेल्या टीकेमुळे भाजपमध्ये नाराजी धुमसत आहे.
भाजपवर टीका सुरुच
शिवसेनेच्या बिहारबाबतच्या भूमिकेचे हत्यार घेऊन नितीशकुमार यांनी भाजपला झोडपल्यानंतर मंगळवारी पुन्हा सेनेच्या मुखपत्रातून भाजपला शालजोडीतील आहेर देण्यात आला आहे. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करताना, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दलही सामनाने चिंता व्यक्त केली आहे. गुन्हेगार मोकाट सुटले आहेत असे बोंबलावे, तर सरकार आपलेच आहे, पण आज दुसरे एखादे सरकार असते, तर त्यांना याच शब्दांनी चोपले असते, असा प्रहार करण्यात आला आहे.