युती तोडण्याची मागणी करीत भाजपच्या राज्य परिषदेत गुरुवारी काही नेते व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र सावध पवित्रा घेत युतीचे राज्य आणण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या मनातील शिवशाहीचे स्वप्न साकार करण्याचा उल्लेख त्यांनी भाषणात दोन-तीनदा केला. प्रसिद्धी माध्यमे केवळ भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे प्रवक्ते वगळता राज्यातील नेत्यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी घालण्याची सूचना त्यांनी प्रदेशाध्यक्षांना केली. अन्य पदाधिकाऱ्यांनी जनतेची कामे करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्य पक्षांमधील नेतेमंडळी भाजपमध्ये पुढील काही दिवसांत येतील, हे सांगतानाच ‘आता माझे काय होईल,’ अशी चिंता न करता पक्षासाठी काम करावे आणि सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी बजावले. ‘दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र,’ अशा घोषणांचा संदर्भ देत व्यक्तींची व नेत्यांची काळजी करू नका. निर्णय घेण्यासाठी नेतृत्व सक्षम आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
अच्छे, म्हणजे सस्ते नव्हे!
‘अच्छे दिन, म्हणजे सस्ते दिन’ नाही, फुकटचे काही मिळणार नाही, असे नरेंद्र मोदींनी सांगितले असल्याचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने रेल्वेदरवाढ आवश्यकच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पण लगेच ही अन्यायकारक दरवाढ मागे घेऊन सरकारने संवेदनशीलता दाखविली, असेही त्यांनी सांगितले.
भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली असून केंद्रातील ३६ मंत्री आणि चार मुख्यमंत्री प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा १५ जुलैपासून सुरू करणार असल्याचे संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी जाहीर केले.