जेएनपीटी आणि मुंबई यांना जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या सीलिंकऐवजी समुद्राखालून जाणारा २२ किलोमीटरचा बोगदा जास्त फायद्याचा ठरेल, असे मत केंद्रीय नौकायनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मात्र याबाबत अंतिम निर्णय राज्याचा असेल, असे सांगून त्यांनी या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री व आपल्यात काहीच मतभेद नसल्याचेही स्पष्ट केले. भाऊचा धक्का ते मोरा (उरण) या दरम्यान स्पीडबोट सेवेचे अनावरण करताना ते बोलत होते.
जेएनपीटी या महत्त्वाच्या बंदराला मुंबईशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात शिवडी येथून थेट पूल बांधण्यात येणार आहे. मात्र हा पूल उभारण्याऐवजी पाण्याखालून बोगदा बांधल्यास ते जास्त सोयीचे ठरेल, असे गडकरी म्हणाले. सागरी सेतूचा प्रस्ताव आपण महाराष्ट्रात मंत्री असताना मांडला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.