शीव-पनवेल महामार्गावर खारघर येथे टोलच्या मुद्दय़ावरून पनवेलच्या राजकीय पक्षांमध्ये खलबत सुरू झाली, त्या टोलधाडीचा प्रश्न स्वत: आपण निकाली काढणार असल्याची, ग्वाही आज केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ठाकुर यांच्या भाजप प्रवेशाच्या सोहळ्यात दिली. आपणच या टोलचे निर्माते आहोत, जो खेळ मी सुरू केला, तो खेळ मीच संपवणार असे हिंदी भाषेत शेरेबाजी करून गडकरींनी प्रशांत ठाकूर यांना टोलविषयीची मार्ग काढणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले.
प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसला रामराम करून  हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.  जेएनपीटीमध्ये यानंतर टोलच्या धोरणामध्ये रस्त्यावरील वाहनांवर टोल लादण्याऐवजी थेट कंटेनरवर टोलवसुलीचे धोरण आणत असल्याचे या वेळी जाहीर केले. या वेळी भाजप हा मुसलमानांच्या विरोधात नसलेला पक्ष असल्याचे जाहीर केले. गडकरींनी राज्यात शिवशाहीचे सरकार येणार असल्याचेही ठणकावून सांगितले. या वेळी विनोद तावडे यांनी आपल्या जेएनपीटीमध्ये भविष्यातील रोजगाराच्या संधीबद्दल सांगताना उरणच्या शेकापच्या आमदाराने कोणत्याही प्रकारचा उरणचा विकास केला नसल्याचा आरोप आमदार विवेक पाटील यांचे नाव न घेता केला.