ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम रखडविल्याने आंबेडकर अनुयायी नाराज आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आंदोलनाची दिशा स्पष्ट केली असून ऐरोली येथील एका बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पहिले आंदोलन करण्यात येणार आहे. यांनतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सर्व शहरभरात  विभागवार बैठक घेऊन आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली जाणार आहे.

आंबेडकर स्मारकाचे रखडलेले काम, झोपडय़ांवर होणाऱ्या कारवाई आणि धार्मिक स्थळांवर होत असलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. ऐरोली येथील बैठकीमध्ये महापौर सुधाकर सोनवणे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, शिवसेनेचे नगरसेवक समाज वाडे, आरपीआयचे सिद्राम ओव्हाळ, यशपाल ओव्हाळ आदी नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.  वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.