वांद्रे टर्मिनसहून पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी गाडय़ा हव्यात, ही पश्चिम उपनगरांतील चाकरमान्यांची मागणी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दृष्टीने मात्र अव्यवहार्य आहे. अशा गाडय़ा सुरू करण्यासाठी नायगाव ते दिवा-वसई मार्गादरम्यान नवीन मार्ग टाकावा लागेल. त्यासाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कोकणातल्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वे एवढा खर्च उचलणार नाही. एखादी संस्था किंवा मोठी कंपनी पुढे येऊन त्यांनी रेल्वेला ही मार्गिका बांधून दिल्यास पश्चिम उपनगरांतील चाकरमान्यांची ही मागणी रेल्वे पूर्ण करेल, असे अजब तर्कट त्यांनी पुढे केले आहे. मात्र  लोकप्रतिनिधींनी मात्र थेट रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे.
वांद्रय़ाहून सुटणारी गाडी कोकणात जाण्यासाठी वसईला थांबवून त्या गाडीची दिशा बदलावी लागते. हे व्यावहारिकदृष्टय़ा कठीण आहे. त्यामुळे नायगाव ते दिवा-वसई मार्ग या दरम्यान एक नवीन रेल्वेमार्ग टाकण्याचा विचार सुरू आहे.
हा दोन ते तीन किलोमीटरचा मार्ग टाकण्यासाठी अंदाजे ४०० ते ४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले. कोकणात जाणाऱ्या गाडय़ा वगळता या मार्गिकेचा इतर उपयोग काहीच नाही. त्यामुळे एवढा खर्च करणे पश्चिम रेल्वेला परवडणार नाही, असे ते म्हणाले. मात्र एखाद्या बडय़ा कंपनीने किंवा संस्थेने पुढे येऊन ४५० कोटी रुपये रेल्वेला निधी म्हणून दिल्यास रेल्वे हे काम पूर्ण करू शकेल, असे हेमंतकुमार यांनी स्पष्ट केले.
भाजप आमदार विनोद तावडे यांनी याबाबत पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांवर टीका केली. कोकणातल्या लोकांना गरज आहे म्हणून रेल्वे चालत नाही. देशाला गरज आहे, म्हणून रेल्वेचे जाळे विणायचे असते. रेल्वेकडे निधी नसेल, तर आता नव्या ‘पीपीपी’ योजनेतून हे काम करण्याचा विचार होऊ शकतो. किंवा खासगी गुंतवणुकीतूनही या प्रकल्पाचे काम होऊ शकते. हा सल्ला रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.