सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र या वावडय़ांना पूर्णविराम दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या हयातीतल त्रास देणाऱ्यांना पक्षात पुन्हा घेणार नाही, शिवसैनिकही त्यांना स्वीकारणार नाहीत, असे स्पष्ट करत उद्धव यांनी भुजबळ यांना सेनेची दारे बंद असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक व समता परिषदेचे विदर्भ अध्यक्ष किशोर कान्हेरे यांनी सोमवारी उद्धव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कान्हेरे यांच्यापाठोपाठ भुजबळही सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवडय़ात रंगल्या होत्या. आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी त्यांच्यासाठी उद्धव यांच्याकडे शब्द टाकल्याचेही स्पष्ट झाले होते. मात्र, खुद्द उद्धव यांनीच या चर्चाना पूर्णविराम दिला. केवळ भुजबळ यांनाच नव्हे तर अन्य सेना बंडखोरांना पुन्हा पक्षात स्थान देणार नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. भुजबळांच्या प्रवेशाची कोणताही बातमी नसून सगळेच इकडे आले तर राष्ट्रवादीशी लढण्यात अर्थ काय, असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेला चांगले लोक अपेक्षित असून ज्यांना यायचे आहे, त्यांनी लवकर यावे असे निमंत्रणही त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा शिवसेनाप्रवेश नक्की झाला आहे. ते ऑगस्टमध्ये शिवसेनेत येणार आहेत. सावंतवाडीची जागा आम्हीच लढविणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा-मुस्लीम आरक्षणाबाबत आधी सरकारचा हेतू काय आहे, ते स्पष्ट होऊ द्यात. निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेला आरक्षणाचा हा निर्णय न्यायालयात टिकतो का हेही पाहणे महत्त्वाचे असल्याने आपण त्याबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीत योग्य तो सन्मान राखला जात नसल्याने नाराज असलेले छगन भुजबळ राष्ट्रवादीचा त्याग करण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा होती. भुजबळ यांनी आधी भाजपचे दार ठोठावले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील धुरिणांनी त्यांना विरोध दर्शवला होता. खुद्द भुजबळ यांनी मात्र शिवसेनाप्रवेशाच्या वृत्ताचे खंडन केले होते.

भुजबळांच्या प्रवेशाची कोणताही बातमी नसून सगळेच इकडे आले तर राष्ट्रवादीशी लढण्यात अर्थ काय? शिवसेनेला चांगले लोक अपेक्षित असून ज्यांना यायचे आहे, त्यांनी लवकर यावे.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख