मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या प्रकल्पांच्या अधिभारामुळे ट्रान्स हार्बर आणि हाबरचे भाडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अधिाभाराचा फटका लांबच्या प्रवाशांना सर्वाधिक बसणार असून १० किमी अंतरातील प्रवासाच्या भाडय़ाला बसणार नाही.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पांतर्गत रेल्वेचे विविध प्रकल्प सध्या सुरू आहेत. यामध्ये रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणात बदल, ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान पाचवा-सहावा मार्ग, हार्बर मार्गावर एलिव्हेटेड रेल्वे आणि १२ डब्यांची गाडी सुरू करणे, १२ तसेच १५ डब्यांच्या गाडय़ा सुरू करणे, नव्या आधुनिक पद्धतीच्या उपनगरी गाडय़ा आणणे आदी प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद राज्य सरकार ५० टक्के आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ ५० टक्के करणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे स्वत:चा निधी नसून केंद्र सरकारकडून त्यांना निधी देण्यात येत असतो.
सध्या ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर असलेल्या उपनगरी रेल्वे प्रवासाच्या भाडय़ामध्ये सिडकोचा एक रुपया अधिभार समाविष्ट आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा १ जानेवारीपासून लागू होणारा अधिभारही त्यावर लावण्यात येणार असल्यामुळे या मार्गाचे भाडे दुप्पट होण्याची शक्यता आहे.
अधिभार लावण्याबाबत रेल्वे बोर्डाने मागील दोन टप्प्याच्या अधिभाराचा समावेश केला तर मुंबईकरांवर एकदम सहा रुपयांचा अधिभार पडू शकतो. १ जानेवारीपासून लावण्यात येणारा अधिभार हा १० किमी अंतरापर्यंतच्या प्रवासाला लागू होणार नाही. मात्र त्यानंतर १५० किमी प्रवासासाठी द्वितीय वर्गाला तीन रुपये तर प्रथम वर्गाला सहा रुपयांचा अधिभार लागेल. दुसऱ्या वर्गाच्या मासिक पासामध्ये पहिल्या ५० किमीसाठी पूर्वी १० रुपये अधिभार होता तो आता ३० रुपये होईल. १५० किमीसाठी पूर्वी २० रुपये होता तो आता ६० रुपये होणार आहे.
याव्यतिरिक्त हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील सिडकोचा अधिभार दोनवेळा वाढेल. कारण हार्बर मार्गावर सुरू होत असलेल्या १२ डब्यांच्या गाडय़ा! हार्बर मार्गावर सुरू होत असलेल्या नव्या प्रकल्पामुळे हार्बर मार्गावर लवकरच सिडकोचा अधिभार लागू होणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे प्रवास भाडे दुपटीहून वाढणार आहे.