राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांकडून मानवंदना देण्याची पद्धत एका परिपत्रकाद्वारे बंद करण्यात आली आहे. राज्याच्या गृहखात्याचा कार्यभार पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच हा निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांना आता कुणालाही मानवंदना देण्याची गरज नाही.
मानवंदना मिळाली नाही म्हणून याआधी अनेकवेळा रुसवेफुगवे झाले आहेत. इतकेच नव्हे तर काही पोलिसांना कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे. गृहखात्याचा कार्यभार स्वीकारताच अनेक जुन्या रुढींना फाटा देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानवंदना पद्धत बंद करण्याचे आदेश जारी केले. त्यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे तत्कालीन महानिरीक्षक देवेन भारती यांनी १३ एप्रिल रोजी पत्रक काढून राज्यातील पोलिसांना या निर्णयाची कल्पना दिली आहे.