चीनमध्ये झालेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून विजयश्री खेचून आणणारा मुंबईचा हॉकीपटू युवराज वाल्मीकीला राज्य सरकारच्या नाकर्तेपणापुढे मात्र पराभव पत्करावा लागला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनातील घर लालफितीच्या कचाटय़ात अडकल्याने युवराजला मंत्रालयात खेटे घालावे लागत आहेत.
गेल्या वर्षी पार पडलेल्या आशियाई हॉकी चॅम्पियन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान सामना रंगला होता. या सामन्याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागले होते. उभय संघांनी निर्धारित वेळेत एकही गोल करता न आल्याने सामन्यचा निकाल पेनल्टी ‘शूट-आऊट‘मध्ये लागला. दोन्ही संघांचे पहिले प्रयत्न फसले. पण पुढील दोन प्रयत्नांत भारताला दोन गोल करण्यात यश मिळाले. पाकिस्तानचा एक प्रयत्न फसला, पण एक पेनल्टीवर गोल करण्यात त्यांना यश मिळाले. भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी नव्या दमाच्या युवराजवर विश्वास दाखवला. युवराजही ही पेनल्टी-किक भारतासाठी महत्त्वपूर्ण होती. स्टेडिअममध्ये तणावाचे वातावरण होते. मन एकाग्र करून तो पुढे सरसावला. पाकिस्तानच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत गोल केला आणि भारताला आघाडीवर आणले. या स्पर्धेद्वारे भारताला युवराजच्या रूपाने युवा हॉकीपटू मिळाला.
मायदेशी परतलेल्या युवराजचे मुंबई विमानतळावर हजारो नागरिकांनी जंगी स्वागत केले. देशभरातून युवराजवर पारितोषिकांची उधळण झाली. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवराजचे तोंड भरून कौतुक केले. त्यांनी मरिन ड्राइव्ह येथे झोपडीवजा घरात राहणाऱ्या युवराजला घर, नोकरी आणि रोख १० लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचे आश्वासनही दिले. सरकारने तत्परता दाखवत १० लाख रुपयांचा धनादेश युवराजला तात्काळ दिला. मात्र २०१२ वर्ष सरले तरी सरकार आश्वासनांची पूर्तता करू शकलेले नाही. युवराज आई-वडील आणि चार भावांसह आजही मरिन ड्राईव्ह येथील निळकंठ-निरंजन सोसायटीच्या आवारातील घरात दिवस कंठत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झोपडीवजा घराच्या जागी छोटे पक्के घर उभे राहिले. तब्बल ४० वर्षांनी विजेच्या दिव्यामुळे त्याचे घर लख्ख उजळून निघाले आणि महापालिकेच्या कृपेमुळे जलजोडणीही मिळाली.
युवराजचा लहान भाऊ देवेंद्र सध्या १९ वर्षांखालील भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करीत आहे. मात्र देशाला दोन हॉकीपटू देणाऱ्या वाल्मीकी कुटुंबाला सोसायटीच्या मेहरबानीवर अवलंबून लहानशा घरात खितपत पडावे लागले आहे. युवराज एअर इंडियात कंत्राटावर नोकरीला लागला होता. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून त्याला सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आशियाई हॉकी चॅम्पियन ट्रॉफीतील यशानंतर पारितोषिकांच्या रूपात मिळालेल्या पैशांवर त्याला आपला आणि कुटुंबाचा खर्च भागवावा लागत आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे चांगले घर मिळेल असे युवराजला वाटले होते. घरासाठी त्याला तब्बल पाच वेळा मंत्रालयात जावे लागले. पण त्याच्या घराची फाइल  अडकली आहे. क्रीडापटूंना सुविधा दिल्या तर क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र अग्रभागी राहू शकेल. परंतु सरकारला त्यांची कदर नाही, अशी खंत युवराजने व्यक्त केली.