बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्रफळाच्या निवासी सदनिका आणि निवासी गाळ्यांच्या मालमत्ता करात पुढील पाच वर्षे वाढ न करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने सुमारे १७ लाख मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५ पासून होणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली असून, त्यानुसार विविध मालमत्तांवर कराची आकारणी केली जाते. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम १४० ए मधील तरतुदीनुसार महानगरपालिका क्षेत्रांमधील सर्वच मालमत्तांच्या करामध्ये ४० टक्के इतकी वाढ होणार आहे. त्यामुळे या अधिनियमात सुधारणा करुन निवासी वापरकर्त्या लहान सदनिकाधारक आणि गाळेधारकांच्या करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईमधील ५०० चौरस फुट (४६.४५ चौरस मीटर) किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या लहान सदनिका आणि गाळे हे बहुतांश जुन्या इमारतींमधील आहेत. त्यांची संख्या १६ लाख ७९ हजार २६५ इतकी असून, या इमारती सध्या विविध योजनांखाली पुनर्विकसित होत आहेत. अशा सर्वसामान्य परिस्थितीतील लहान निवासी सदनिका आणि गाळ्यांना करवाढीतून सूट दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.