पल्लवी पूरकायस्थ बलात्कार आणि हत्याप्रकरणातील दोषी सज्जाद मुघल याने पॅरोल मिळाल्यावर पलायन केल्यानंतर बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. या प्रकरणानंतर तुरुंग नियमावलीत आवश्यक ते बदलही केले जाणार आहेत. वकील आणि राष्ट्रीयस्तरावरील जलतरणपटू असलेल्या पल्लवी पूरकायस्थच्या हत्येने संताप व्यक्त होत होता. मुंबई पोलिसांनीही तातडीने कारवाई करत सज्जादला बेड्या ठोकल्या होत्या. मात्र पॅरोलचा फायदा घेत सज्जाद पुन्हा एकदा पसार झाला. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानंतर लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

लोकांच्या याबाबतच्या प्रतिक्रिया थोड्या आक्रमक आहेत. अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असं अनेकांना वाटतं. तसंच राजकीय पक्षांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, असंही मत नोंदवण्यात आलं आहे. केवळ बलात्कार नव्हे तर कोणत्याही आरोपीला पॅरोल दिला जाऊ नये, असं निलेश इंगळे यांना वाटतं. बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी ‘संत तुकाराम’ नसतो. दानवालाही लाजवेल असा क्रूर दैत्य असतो. ‘पॅरोल’ची खिरापत मिळाली तर तो पुन्हा गुन्हा करुन फरार होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय योग्यच असल्याचं प्रदिप पावसकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयाच्या बाजूनेच कौल असला तरी, एखाद्या व्यक्तीला बलात्काराच्या प्रकरणात गोवण्यात आले असल्यास त्याच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक ठरू शकतो, असं परखड मत शिवाजी बोराडे यांनी मांडलं आहे. कायद्यासमोर सगळे सारखे असून इतर आरोपींसाठी जे नियम आहेत तेच यांनासुध्दा असावेत असं मत राज या वाचकाने व्यक्त केलं आहे.