पावसाने कोकण, विदर्भात चांगली प्रगती केली असली तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मात्र अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. राज्यातील २००च्या आसपास तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता टंचाईग्रस्तांना ३१ ऑगस्टपर्यंत सवलतींचा लाभ देण्यात येणार आहे.
पाऊस अद्यापही राज्यभर सक्रिय झाला असला तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील परिस्थिती गंभीर असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या २६ टक्केच साठा शिल्लक आहे. गत वर्षी याच काळात राज्यातील जलाशयांमध्ये ५० टक्के साठा होता. कोकणात ५६ टक्के पाण्याचा साठा असून, मराठवाडा (१५ टक्के), नागपूर (४३ टक्के), अमरावती (२८ टक्के), नाशिक (१७ टक्के) आणि पुण्यात २६ टक्के सध्या शिल्लक आहे.
टंचाईग्रस्तांना मिळणाऱ्या विविध सवलती ३१ जुलैपर्यंत देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. सध्याच्या परिस्थितीत या सवलतींना महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याने धरणांमधून पाणी सोडण्यासाठी स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आल्या आहेत. ३३ टक्के साठा झालेल्या जलाशयांमधून शेतीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन खात्याचे सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिली.