मुंबईत जागेची टंचाई असल्याने गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्याचे शासनाचे धोरण असले तरी, मुंबई शहर हे भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने उंच इमारतींना परवानगी देऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी यापूर्वी देऊनही शासकीय यंत्रणांनी हा सल्ला गांभीर्याने घेतलेला नाही.
नेपाळला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने राजधानी काठमांडू शहरातील उंच इमारती कोसळल्या वा त्यांचे नुकसान झाले. दक्षिण मुंबईत सध्या जागोजागी ३० मजल्यांपेक्षा उंचीच्या गगनचुंबी इमारती उभारण्यात आल्या आहेत वा कामे सुरू आहेत. दक्षिण मुंबईत सध्या १० ते १५ इमारती तर ६० मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या आहेत. काही गगनचुंबी इमारती उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. मुंबईत जागेची टंचाई असल्याने आडवी वाढ शक्य नसल्याने उंच इमारती उभारून घरांची निकड पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेकडून उंच इमारतींना परवानगी दिली जाते.
मुंबई हे शहर भूकंपप्रवण क्षेत्राच्या श्रेणी तीनमध्ये मोडते. मुंबईला भूकंपाचा मोठा तडाखा बसला नसला तरी शेजारील ठाणे परिसरात नेहमीच छोटे-मोठे भूकंपाचे धक्के बसतात. यामुळेच मुंबईत मोठय़ा वा उंच इमारतींच्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आय.आय.टी. मुंबईचे माजी प्राध्यापक व्ही. सुब्रमण्यम यांनी दिला होता. गुजरातच्या भूजमधील भूकंपानंतर सातत्याने सुब्रमण्यम यांनी शासकीय यंत्रणांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. पण या सल्ल्याकडे शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. ठाण्यातील खर्डी किंवा आसपासच्या प्रदेशात चार रिश्टल स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. ठाणे खाडीच्या पलीकडे तसेच कल्याण क्षेत्रातही गेल्या आठ-दहा वर्षे भूकंपाचे छोटे धक्के बसत असतात. मुंबईच्या अगदी जवळ धक्के जाणवले आहेत. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता भविष्यात मुंबईला सहा रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाचा धक्का बसू शकतो, असा धोक्याचा इशारा सुब्रमण्यम यांनी दिला आहे.
मुंबई भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने २० मजल्यापेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.