एसटीचा ‘पुणे पॅटर्न’ आता राज्यभरात

कमी होत चाललेले भारमान सावरण्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून, आता प्रवासी संख्या वाढवण्यासाठी वेगवान सेवेवर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘विनावाहक, विनाथांबा’ सेवांचा ‘पुणे पॅटर्न’ आता महामंडळ राज्यभरातील १५० मार्गावर लागू करणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार असून एसटीलाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा मुंबई-पुणे या मार्गावरही सुरू होणार असून त्यामुळे धाववेळ अध्र्या तासाने कमी होण्याची शक्यता आहे.

राज्य परिवहन महामंडळातर्फे काही वर्षांपूर्वी निवडक मार्गावर ‘विनावाहक, विनाथांबा’ सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. या सेवेचे दोन प्रकार असून एका प्रकारात बस सुटण्याच्या स्थानकात प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर ती बस थेट शेवटच्या स्थानकात थांबवली जाते, तर दुसऱ्या प्रकारात गाडीत वाहक नसतो, पण विविध थांब्यांवर असलेले वाहक प्रवाशांना तिकीट देतात. प्रवाशांचा वेळ वाचावा, या उद्देशाने या सेवा पुणे-बारामती, पुणे-सातारा या मार्गावर सुरू करण्यात आल्या होत्या.

या मार्गावर सेवा सुरू केल्यानंतर प्रवासी भारमान ७० ते ७५ टक्के एवढे झाल्याचे लक्षात आले आहे. विशेष म्हणजे मुंबई-पुणे या मार्गावरील प्रवासी संख्या वाढवण्यासाठी दादर-पुणे या मार्गावर सध्या असलेल्या सेवांपैकी बहुतांश सेवा विनावाहक चालवण्याचा निर्णयही महामंडळ घेणार आहे.

या सेवेचा विस्तार करण्यासाठी एखाद्या मार्गावर किमान ४० प्रवासी मिळतील, अशी बसस्थानके निवडली जातात. ज्या मार्गासाठी अर्धा तास किंवा चार तास लागतील, अशाच मार्गाची निवड करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले.

  • या सेवांना उत्तम प्रतिसाद मिळायला लागल्यावर या सेवांचा विस्तार ठाणे-बोरिवली, ठाणे-भिवंडी या मार्गावरही करण्यात आला.
  • आता कोल्हापूर-इचलकरंजी, पुणे-औरंगाबाद, कोल्हापूर-सांगली, पनवेल-अलिबाग, कल्याण-मुरबाड, कल्याण-भिवंडी, ठाणे-भाईंदर अशा तब्बल १५० मार्गावर ही ‘विनावाहक, विनाथांबा’ सेवा चालू करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.