क्षयरोगावर उपचार करण्यासाठी पालिकेने जोरदार मोहीम उघडली असली तरी आता आरोग्य विभागासमोर वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे. इतरत्र क्षयरोगाचे निदान होऊन त्यावरील उपचारांसाठी केईएममध्ये आलेल्या रुग्णांपैकी तब्बल ५२ टक्के रुग्णांना क्षयरोग झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पाहणीतून समोर आले आहे. यातील १० टक्के रुग्णांना कर्करोग झाल्याचे आढळले असून छातीच्या क्ष किरण चाचणीवरून चुकीचा निष्कर्ष काढला गेल्याने रुग्णांना मूळ आजारावर वेळेत उपचार मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजार बरा करण्यासाठी योग्य निदान होणे गरजेचे असते. मात्र, चुकीचे निदान होत असल्याने फुप्फुसाचे इतर संसर्ग असलेल्या रुग्णांवरही क्षयरोगाचे उपचार केले जात आहेत. त्यामुळे ‘रोग परवडला, पण उपाय आवरा’ असे म्हणायची वेळ सरकारी डॉक्टरांवर आली आहे. केईएमच्या छातीविकार विभागात दररोज शेकडो रुग्ण येतात. या रुग्णांमध्ये क्षयरोग झाल्याचे निदान घेऊन आलेल्या ७०० रुग्णांबाबत छातीविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करण्यात आला. या रुग्णांना त्यांच्या छातीच्या क्ष किरण चाचणीवरून क्षयरोग झाल्याचे निदान आधीच्या डॉक्टरांनी केले होते. त्यानंतर क्षयरोगावरील औषधे सुरू करूनही आजार कमी होत नसल्याने हे रुग्ण केईएममध्ये आले होते. या ७०० रुग्णांना तपासल्यानंतर त्यातील ५२ टक्के रुग्णांना क्षयरोग नसल्याचे निष्पन्न झाले. यापैकी दहा टक्के रुग्णांना कर्करोग झाला होता तर इतरांना फुप्फुसाचे इतर संसर्ग होते. मात्र, या सर्वच रुग्णांनी सरासरी चार महिने क्षयरोगावरील औषधे घेतली होती. त्यामुळे मूळ आजार बाजूलाच पडला होता. महापालिकेने आयोजित केलेल्या मुंबईमधील क्षयरोगाच्या कार्यशाळेत डॉ. आठवले यांनी क्षयरोगासंबंधीच्या आव्हानावर सादरीकरण केले.
जनरल डॉक्टरकडून उपचारांना सुरुवात केल्यानंतर साधारणत: १६ आठवडय़ांनी रुग्ण केईएममध्ये पोहोचतो, असे दिसून आले आहे. चुकीच्या निदानामुळे या काळात या रुग्णांना योग्य ते उपचार मिळाले नाहीत. क्षयरोगासाठी दिली जात असलेली औषधे उपयोगाची नाहीत, असेही त्यांना वाटू शकते. मात्र या सर्वाचे मूळ चुकीच्या निदानपद्धतीत आहे.    – डॉ. अमिता आठवले,
केईएमच्या छातीविकार विभागाच्या प्रमुख
क्षयरोगावरील उपचारांसाठी आणखी १२० डॉट्स केंद्र
केंद्राकडून आखून देण्यात आलेल्या नियमावलीनुसार उपचार उपलब्ध करणारी आणखी १२० केंद्रे मुंबईत सुरू केली जाणार आहेत. सध्या शहरात सुमारे १२०० केंद्रे आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत क्षयरोगाच्या निदानासाठी प्रभावी यंत्रणा राबवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ही केंद्रे उपयोगी ठरणार आहेत.