फेरीवाल्यांच्या नोंदणीवरून नगरसेवकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेले पालिकेचे विशेष सभागृह भूमिपूत्रांच्या मुद्दय़ावरून तहकूब करण्याची वेळ बुधवारी आली.
फेरीवाल्यांच्या नोंदणीबाबत प्रशासन योग्य ती खबरदारी घेत नसल्याचा आरोप करून या धोरणामुळे फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढल्याचा आरोप सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला. मात्र सत्ताधाऱ्यांचाच प्रशासनावर अंकुश नसल्याने ही समस्या ओढवल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी मात्र सेनेच्या बाजूने मत टाकत प्रशासनावर तोफ डागली. यानंतर रईस शेख यांनी फेरीवाला धोरण तसेच प्रशासनाच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली. निवडणुकांवर डोळा ठेवून ‘भूमीपुत्र’शब्दाचे राजकारण होत असल्याचा त्यांचा आरोप ऐकल्यावर सत्ताधारी व विरोधकेही अस्वस्थ झाले.
रईस शेख भूमीपुत्र नसल्याने त्यांना स्थानिकांबद्दल आस्था नसल्याचा आरोप भाजपाच्या नगरसेविका बीना दोशी यांनी केला. मी भूमीपुत्र नसेन तर तुम्हीही नाही. तुम्ही तर गुजरातहून आला आहात, असे रईस शेख यांनी म्हटल्यावर भाजपचे सर्व नगरसेवक त्यांच्यावर चाल करून आले. एका समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याने हे वाक्य पटलावरून काढून टाकण्यात येईल, असे महापौरांनी सांगितल्यावरही भाजप नगरसेवक शांत झाले नाहीत. रईस शेख यांनी वाक्य मागे घेण्यास आणि माफी मागण्यास नकार दिला. या गोंधळात सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करून गटनेत्यांची बैठक महापौर दालनात घेण्यात आली. मात्र तेथेही माघार घेण्यास कोणीही तयार नसल्याने फेरीवाल्यांच्या नोंदणीचा मुद्दा अर्धवटच राहिला.