अबालवृद्धांच्या ओठांवर कित्येक दशके गझला रूळवणारे रचनाकार तसेच गीतकार निदा फाजली यांचे त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
मुक्तिदा हसन निदा फाजली हे निदा फाजली या नावाने प्रसिद्ध होते. गेले काही दिवस ते सर्दी व कफाच्या त्रासामुळे त्रस्त होते. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. यासाठी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात त्यांना डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले. फाजली यांनी लिहिलेल्या अनेक गीत व गझलांनी रसिकांच्या मनावर गारूड केले होते. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने अनेक गझल रसिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
श्रद्धांजली
* निदा फाजली यांच्या मृत्यूमुळे उर्दू साहित्याने थोर व्यक्तिमत्त्व गमावले आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
* निदा फाजली हे त्यांनी लिहिलेल्या अजरामर गीतांमुळे सगळ्यांच्याच लक्षात राहतील. त्यांच्या या गीतांनी एका पिढीवर आपले गारूड निर्माण केले होते. – सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा
* निदा फाजली यांच्या जाण्याने मला धक्का बसला असून त्यांचे आणि माझे खूप चांगले व्यक्तिगत संबंध होते. फाजली हे भारतीय साहित्यातील एक चांगले प्रतिक होते. कवितेचे ते उत्तम जाणकार होते. त्यांच्या जाण्याने भारतीय साहित्य व उर्दू भाषेची हानी झालेली आहे.
– रहमान अब्बास, उर्दू लेखक

साहित्य अकादमी पुरस्काराचा सन्मान लाभलेले फाजली यांचा जन्म दिल्लीत झाला. कश्मिरी कुटुंबात जन्मलेल्या फाजली यांचे शिक्षण ग्वाल्हेरला झाले. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे आई-वडील हे पाकिस्तानात गेले होते. मात्र, फाजली यांनी भारतातच राहणे पसंत केले. यामुळे त्यांची त्या काळी वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या उर्दूतील रचना, दोहे, कविता आणि त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण यांमुळे त्यांनी रसिकांच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘धर्मयुग’सारख्या मासिकांतून गझलांचे लेखन केले होते. त्यांच्या या लेखन कौशल्यामुळे अनेक उर्दू लेखक व चित्रपट निर्माते त्यांच्या गझलांकडे आकर्षिले गेले होते. त्यांच्या या योगदानामुळे भारत सरकारने त्यांना २०१३ साली पद्मश्री पुरस्कारानेही गौरविले होते. ‘तू इस तरहा से मेरे जिंदगी मे’, ‘कभी किसी को मुकंमिल जहां नही मिलता’, तसेच ‘सूर’ चित्रपटातील लकी अली यांनी गायलेले ‘आं भी जा’ ही त्यांची गीते विशेष लोकप्रिय आहेत. मात्र, ‘सरफरोश’ चित्रपटातील ‘होशवालों को खबर क्या’ या गझलेने अनेकांच्या मनाचा हळवा कोपरा व्यापून टाकला.